गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण; चांगल्या कामामुळेच पुण्याच्या आयुक्तपदी

पुणे : गृह विभागातील मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना दिलेला पोलीस परवाना (पास) ही मोठी चूक होती. या चुकीला शिक्षाही झाली, पण गुप्ता यांची कारकीर्द पाहिल्यास ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचे काम चांगले आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पुण्यात सांगितले. वाधवान प्रकरणात गुप्ता यांच्यावर  टीकेची  झोड उठविण्यात आली असताना त्यांची  पुण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुप्ता यांच्यावर वाधवान प्रकरणात कारवाई झाल्यानंतर त्यांना पुण्याचे पोलीस आयुक्तपद बहाल करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता देशमुख म्हणाले, गुप्ता यांची चूक झाली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच त्यांची बदलीही करण्यात आली. त्यांचे काम चांगले असून  ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना जबाबदारी द्यायची होती. पुणे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर आता सोपविण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर राज्यातील पोलीस गेले सहा महिने बंदोबस्तात आहेत. पोलीस थकले असले तरी ते हिम्मत हारलेले नाहीत. राज्यात पोलिसांचे काम खूप चांगले आहे. बंदोबस्तात पोलीस बाधित झाले. मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीपोटी ६५ लाख रुपये देण्यात आले आहेत. राज्यभरातील २०२ करोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ५५ वर्षांच्या पुढील पोलिसांना घरातूनच काम करण्यास सांगण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात काम दिले नाही, असे त्यांनी नमूद केले.