पिंपरीतील सेवाविकास बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना, बँकेत गुंडाराज आहे, असे विधान एका माजी संचालकाने केल्याने गोंधळ झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदाणी व त्यांचे प्रतिस्पर्धी आसवानी बंधू यांच्यात या वेळी बरेच खटके उडाले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात सकाळी ही विशेष सभा सुरू झाली. दहा शेअर असतील तरच मतदानाचे अधिकार असावेत, या विषयानंतर बँकेचे भागभांडवल वाढवण्याच्या विषयावर चर्चा झाली. निर्णय मात्र स्थगित ठेवण्यात आला. त्यास माजी संचालक हरेश आसवानी यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर माजी संचालक धनराज आसवानी उभे राहून विरोधात बोलू लागले. तेव्हा ‘तुम्ही नंतर बोला व आधी परवानगी घ्या’, असे मूलचंदाणी त्यांना म्हणाले. त्याकडे दुर्लक्ष करत आसवानी यांनी विरोधी सूर कायम ठेवला. ‘ये गुंडाराज है, गुंडे बँक चला रहे है।’ असे विधान त्यांनी व्यासपीठाकडे बोट करून केले. त्यामुळे सभेत गोंधळ सुरू झाला. उपस्थित महिलांनी ‘गुंडा’ या शब्दावर तीव्र आक्षेप घेतला. गोंधळातच आसवानी तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सुरू झाली. त्याचे मूलचंदाणी यांनी समर्थन केले व याबाबतचा प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठवू, असे जाहीर केले. हरेश आसवानी यांनी आक्षेप घेतला. त्यावरून दोहोत बराच खटका उडाला. त्यानंतर हरेश आसवानी देखील तेथून निघून गेले.