भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे पिंपरीचे शहराध्यक्ष झाले, तेव्हापासून उद्भवलेला वाद मिटवण्यासाठी विरोधी पक्षनेते विनोद तावडे बऱ्याच प्रतीक्षेनंतर शहरात येऊन गेले. दोन्ही गटांशी संवाद साधल्यासारखे करत खाडे हेच शहराध्यक्षपदी कायम राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुखपद देऊन वाद संपल्याचे जाहीर केले.
खाडेंची निवड होताच पिंपरीत मुंडे व गडकरी गटातील वाद टोकाला गेला, प्रकरण चिघळल्यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढण्याची सूचना तावडेंना केली होती, त्याचे कारण एकनाथ पवार व त्यांचे समर्थक तावडेंचे नेतृत्व मानतात. खंडेनवमीला पिंपरीत आलेल्या तावडेंनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले. मुंडे गटातील खाडेंना अभय दिले व गडकरी गटाच्या पवारांची पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखपदी वर्णी लावल्याचे जाहीर केले. पवारांना बढती मिळाल्याचा आनंद त्यांचा समर्थकांना झाला. तर, शहराच्या राजकारणातून पवार हद्दपार झाल्याची उकळी मुंडे गटाला फुटली. मुळात पवारांचे पद भाजपच्या घटनेत नाही. संघटनमंत्री असताना नव्याने संपर्कप्रमुख पद निर्माण करण्यामागे व भोसरीच्या राजकारणातच स्वारस्य असलेल्या पवारांची तेथे नियुक्ती करण्याचे प्रयोजन कोणाच्याही लक्षात आले नाही. समतोल साधण्यासाठी खाडे, पवार यांच्यासह अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, बाळासाहेब गव्हाणे यांनी एकत्र बसून शहर कार्यकारिणीसाठी नावांची शिफारस करावी, अशी सूचना तावडेंनी केली. मुळात जागा कमी अन् शिफारशी करणारे जास्त झाल्याने एकमताने नावे ठरणार नाहीत आणि वाद वाढणार, हे उघड गुपित आहे. एकमेकात भांडणे लागल्याशिवाय मोठय़ा नेत्यांचे ‘दुकान’ चालत नाही. त्यामुळे कार्यकारिणी प्रदेशस्तरावर ठरणार आहे. तावडे यांच्या दौऱ्याने खरेच वाद मिटतील की मोठय़ा प्रमाणात वाद सुरू होतील, याची कोणालाही खात्री देता येत नाही.
मुंडे-गडकरी यांचे सख्यच!
नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्यात गटबाजी नाही. त्यांच्यात कसलेही वाद नाहीत. ‘वरती’ त्यांचे चांगले चालले आहे. गेल्या आठ महिन्यांत कोणाला काही दिसले का, याकडे विनोद तावडे यांनी लक्ष वेधले.