अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, कोकण आणि औरंगाबाद विभागांतील बळींची संख्या शुक्रवारी ४७ वर पोहोचली, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांसह राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सुमारे साडेतीन हजार घरांची पडझड झाली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. पुणे विभागात सरासरी ८१.९ पर्जन्यमान झाले. पुणे शहर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि सासवड, सांगली जिल्ह्य़ात मिरज, वाळवा, तासगाव आणि पलूस, सोलापूर जिल्ह्य़ात उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस या ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

पुणे जिल्ह्य़ात १४६९ कुटुंबांतील ६२२१ नागरिक, साताऱ्यातील ५६ कुटुंबांतील २१३ नागरिक, सांगलीत २१६ कुटुंबांतील १०८१ आणि सोलापुरात ८६०८ कुटुंबांतील ३२ हजार ५२१ अशा एकूण दहा हजार ३४९ कुटुंबांतील ४० हजार ३६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

सर्वाधिक मृत्यू सोलापुरात

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात २९ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील सात जणांचा मृत्यू आणि एक जण बेपत्ता आहे. साताऱ्यात दोघांचा मृत्यू झाला असून सांगलीत सहा जणांचा मृत्यू, तर तीन जण बेपत्ता आहेत. सोलापूर जिल्ह्य़ात १४ जणांचा मृत्यू, तर चार जण बेपत्ता आहेत. औरंगाबाद विभागात १६, तर कोकण विभागात तीन जणांचा मृत्यू झाला.

धुवाधार पाऊस ओसरला..

राज्यात थैमान घालणारा धुवाधार पाऊस आता ओसरला आहे. मात्र, राज्याच्या विविध भागांत मध्यम स्वरूपात परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तेथून ते ओमानच्या दिशेने जाणार आहे.

पंढरपुराला पुराचा विळखा

अतिवृष्टी आणि वीर, उजनी धरणातून सोडलेला मोठा विसर्ग यामुळे चंद्रभागा नदीला गुरुवारपासून पूर आला आहे. यामध्ये शुक्रवारी वाढ होत या पुराचे पाणी पंढरपूर शहराच्या नदीकाठच्या काही भागात शिरले.

नुकसानस्थिती.. पुणे जिल्ह्य़ात १५३, साताऱ्यात ११, सांगलीत २८ आणि सोलापुरातील ८२९ अशी लहानमोठी मिळून १०२१ जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच पुण्यातील २६५, साताऱ्यात २६७, सांगलीत ३६५ आणि सोलापुरातील २२५६ अशी ३१५६ घरे आणि १०० झोपडय़ांची पडझड झाली. याबरोबरच पुण्यातील १८ हजार ७४६ हेक्टर, साताऱ्यातील १४२० हेक्टर, सांगलीत ८२७६ हेक्टर आणि सोलापुरात ५८ हजार ५८१ अशा एकूण ८७ हजार ४१६ हेक्टर ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात, कापूस, तूर अशा पिकांचे नुकसान झाले.