कौटुंबिक स्वरूपाचे नाते असलेल्या रवी परांजपेसरांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे. चित्र कसं काढलं पाहिजे हे मी त्यांच्याकडून शिकलो. खरं तर, आमचं नातं गुरू-शिष्याचं आहे, अशी भावना प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून परांजपे यांच्या अर्धशतकाच्या चित्रशैलीचा मागोवा घेणाऱ्या ‘सिंहावलोकनी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. रवी परांजपे फाउंडेशनतर्फे साकारण्यात आलेल्या ‘रवी परांजपे स्टुडिओ’ या कलादालनाचा या प्रदर्शनाने प्रारंभ झाला. रवी परांजपे यांच्या संकेतस्थळाचे आणि त्यांच्या चित्रांच्या शुभेच्छापत्रांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. ठाकरे यांच्या हस्ते परांजपे यांचा आणि त्यांना अर्धशतकाची साथ देणाऱ्या स्मिता परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे विश्वस्त आणि ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील या वेळी उपस्थित होते.
एका अर्थाने मी भाग्यवान आहे की एस. एम. पंडित, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, रवी परांजपे, बेंद्रे, धोंड, हेब्बर, सातवळेकर अशा दिग्गज चित्रकारांना काम करताना पाहिलयं. त्यांना चितारताना पाहणं हादेखील एक आनंद अनुभवला आहे, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, घराचे कलादालन करणारे परांजपे मला श्रेष्ठ वाटतात. त्यांच्या चित्रातली ‘बोल्ड’ रंगसंगती वैशिष्टय़पूर्ण असून ती करायला िहमत लागते. चित्र कसे पाहावे या विषयी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. पेंटिंग पाहताना त्याला बोट लावणे ही आपली संस्कृती आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची मिळालेली संधी हा माझा सन्मान आहे. कलादालनामध्ये परांजपेसरांचे एक टक्कादेखील काम मांडलेले नाही. त्यामुळे दर आठवडय़ाला हे प्रदर्शन बदलत राहावे असे वाटते.
स्मार्ट शहरासाठी स्मार्ट कलादालन असावे हे स्वप्न आज पूर्ण झाले असल्याची भावना रवी परांजपे यांनी व्यक्त केली. राजकारणात राहूनही राज कलेबद्दल सजग आहे याचे कौतुक वाटते, असेही त्यांनी सांगितले. गोपाळ नांदुरकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘कल्याण-डोंबिवली’बाबत दिवाळीनंतर बोलेन
धोतर आणि नेहरू शर्ट अशा पेहरावामध्ये आलेल्या राज ठाकरे यांनी ‘पवित्र काम करायला आल्यामुळेच धोतर घातलं’ असे सांगितले. राज ‘कल्याण-डोंबिवली’बाबत काही तोंड उचकटतो का पाहू यासाठी पत्रकार आणि कॅमेरामन वाट पाहताहेत, पण  आज मी फक्त कला या माझ्या हक्काच्या प्रांताबद्दलच बोलणार. कल्याण-डोंबिवलीचे दिवाळीनंतर बघू, असे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.