• उमेदवार बदलणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका
  • निवडणुकीच्या दिवशी पालकमंत्र्यांची महापालिकेत हजेरी

पिंपरी  पालिकेतील भाजपच्या वाटणीला आलेल्या स्वीकृतच्या तीन जागांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचला आहे. खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि उमेदवारांची नावे बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे त्यांच्या कानावर घातले. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत उमेदवार बदलले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. काही गडबड होऊ नये म्हणून पालकमंत्री गिरीश बापट हे निवडणुकीच्या दिवशी महापालिकेत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी  पालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड शुक्रवारी (१९ मे) होणार आहे. भाजपला तीन व राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत. भाजपने माउली थोरात, बाबू नायर व मोरेश्वर शेडगे यांना, तर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचही जणांची नावे असलेला प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेवर आहे, मात्र काहीतरी तांत्रिक चुका काढून थोरात व नायर यांची उमेदवारी बदलण्याचा किंवा संबंधित विषय तहकूब ठेवण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत पातळीवर सुरू असल्याचे साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. नियोजित उमेदवार माउली थोरात, बाबू नायर यांच्यासह माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेशाच्या नेत्या उमा खापरे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, नगरसेवक केशव घोळवे आदी या वेळी उपस्थित होते. जवळपास १० मिनिटे मुख्यमंत्र्यांच्या दालनात या विषयावर चर्चा झाली. स्वीकृतवरून पुतळे जाळणे, फोटोंना काळे फासणे, पेपरला उलटसुलट बातम्या छापून आणणे आदी प्रकार सुरू असून हे षडयंत्र कोण रचत आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पिंपरी तील वातावरण कशा पद्धतीचे झाले आहे, याची माहिती शिष्टमंडळाने दिली. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, उमेदवारी बदलणार नाही आणि निवडणुकीची तारीखही लांबणीवर जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यानंतर या शिष्टमंडळाने मंत्रालयातच असलेल्या बापट यांची भेट घेतली. त्यांनाही याबाबतची माहिती दिली. तेव्हा सदस्य निवडीच्या सभेसाठी आपण महापालिकेत उपस्थित राहू, असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही दूरध्वनी करून या बाबतची माहिती देण्यात आली असता, त्यांनीही मुख्यमंत्र्यांप्रमाणेच भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.