पिंपरी पालिकेतील सहा क्षेत्रीय कार्यालयातील स्वीकृत सदस्यांच्या १८ जागांच्या निवडीवरून आता ‘राजकारण’ सुरू झाले आहे. राष्ट्रवादीकडे तब्बल १७५ कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली असताना शिवसेनेने मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना विरोध दर्शवला असून विविध क्षेत्रांतील अनुभवी कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ‘स्वीकृत’च्या नियुक्तीचा विषय तापणार आहे.
पिंपरी पालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या १८ जागांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुक्तांकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागवले, तेव्हा कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. या पदावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, पालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, संपत पवार यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली. नियमानुसार प्रभाग स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करताना राजकीय पक्ष अथवा संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांची नियुक्ती करता येत नाही. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी तरतूद आहे. प्रशासनाने राजकीय नियुक्तया केल्यास शिवसेना आंदोलन करेल आणि न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्षांची चिन्हे असून आयुक्तांपुढे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. शिवसेना राज्यातील सत्तेत आहे, तर राष्ट्रवादीची पिंपरी पालिकेत सत्ता आहे. सर्व १८ जागांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. ‘आमचे नाही, तर तुमचेही नाही’ अशा भूमिकेतून शिवसेनेचा विरोध असल्याचे बोलले जाते.