सतीश शेट्टी खून प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) न्यायालयाने आणखी दहा जणांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. याप्रकरणात आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर, ग्रामीण पोलीस दलाचे सहा पोलीस यांच्यासह २३ जणांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यास न्यायालयाने सीबीआयला पूर्वीच परवनागी दिली आहे.
अॅड.अजित बळवंत कुलकर्णी, रमेश पिराजी सरोदे, दिनेश किशन सरोदे, अश्विनी अशोक क्षीरसागर, अजित अच्युत दातार, नवीन कुमार राय, सीराज रज्जाक बागवान, राजू दत्तात्रय साखरे, संतोष चिंतामण चांदेलकर आणि संतोष मच्छिं्रद जगताप अशी न्यायालयाने पॉलिग्राफ चाचणी करण्यास परवानगी दिलेल्यांची नावे आहेत. या सर्वाचीही पॉलिग्राफ चाचणी घेण्यास परवानगी द्यावी म्हणून सीबीआयचे वकील आयुब पठाण यांनी न्यायालयात अर्ज केला होता. तसेच या सर्वानीही पॉलिग्राफ चाचणी घेण्यास संमती दर्शविली होती. त्यामुळे न्यायालयाने या सर्वाची पॉलिग्राफ चाचणी घेण्यास परवानगी दिली.
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव दाभाडे येथे १३ जानेवारी २०१० रोजी खून करण्यात आला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अॅड. विजय दाभाडेंसह पाच जणांस अटक केली होती. शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी याप्रकरणात सखोल चौकशी व्हावी म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने सप्टेंबर २०१० मध्ये या गुन्ह्य़ाचा तपास सीबीआयकडे दिला होता. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून २३ जणांची पॉलिग्राफ चाचणी घेतली आहे.