भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राज्यातील सर्वच ठिकाणांहून निषेध व्यक्त होताना दिसत आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्येही मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने राम कदम यांचे छायाचित्र असलेल्या फलकावर जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनसेने स्वतंत्र आंदोलन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला आघाडीने एकत्रित आंदोलन केले.
आमदार राम कदम यांनी सोमवारी दहिहंडीप्रसंगी ‘मुलगी लग्नासाठी तयार नसेल, तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. धिक्कार असो धिक्कार असो, राम कदम यांचा धिक्कार असो, असे म्हणत राम कदम यांच्या फलकावरील छायाचित्राला मनसे महिला कार्यकर्त्यानी लिपस्टिक लावली. राम कदम यांची भाजपातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.
