X

गॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर

२००९ मध्ये थ्री इडियट नावाचा हिंदी चित्रपट आला आणि मोहिते यांच्या हेलिकॉप्टर निर्मितीच्या स्वप्नाला नवी उमेद मिळाली. चित्रपटातून प्रेरणा घेत प्रदीप यांनी जोमाने हेलिकॉप्टर बनवायला सुरुवात केली.

कृष्णा पांचाळ,पिंपरी-चिंचवड

स्वप्नांना पंखांचे बळ मिळाल्यास आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते हे एका मराठी तरुणाने सत्यात उतरवून दाखवले आहे. प्रदीप शिवाजी मोहिते अस या ध्येय वेड्या तरुणाचे नाव आहे. प्रदीप यांना लहानपनापासून हेलिकॉप्टरची आवड होती, ते आधी कागदाचे हेलिकॉप्टर बनवायचे…ही आवड त्यांनी एवढी जोपासली की हेच स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. गॅरेजमध्ये काबाड कष्ट घेत प्रदीप यांनी थेट हेलिकॉप्टर तयार केले.

मूळचे सांगलीचे असलेले प्रदीप शिवाजी मोहिते हे सध्या पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. प्रदीप यांचे श्री सिद्धनाथ नावाचे स्वतःचे गॅरेज आहे. प्रदीप यांना लहापणापासूनच हेलिकॉप्टरविषयी फार प्रेम होते, लहान असताना कागदाचे आणि लाकडी हेलिकॉप्टर ते तयार करायचे.

शाळेत मन रमत नसल्याने प्रदीप यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शाळेला रामराम ठोकला. त्यानंतर आई वडिलांनी प्रदीप यांना गॅरेजमध्ये पाठवले. साडेचार वर्ष त्यांनी एका गॅरेजमध्ये काम केले आणि यानंतर स्वत:चे गॅरेज सुरू केले. गॅरेज सुरू केल्यावर कामाच्या ओघात त्यांचे हेलिकॉप्टर निर्मितीचे स्वप्न मागे पडले.

२००९ मध्ये थ्री इडियट नावाचा हिंदी चित्रपट आला आणि मोहिते यांच्या हेलिकॉप्टर निर्मितीच्या स्वप्नाला नवी उमेद मिळाली. चित्रपटातून प्रेरणा घेत प्रदीप यांनी जोमाने हेलिकॉप्टर बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा चारचाकी गाडीचे इंजिन बसवले आणि अवघ्या तीन वर्षांत त्यांनी देशी बनावटीचे हेलिकॉप्टर हवेत उचलले. या प्रयत्नात प्रदीप यांचे हेलिकॉप्टर तीन वेळेस क्रॅश झाले.अपघात झाला पण अपयशाला खचून न जाता त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.हेलिकॉप्टर निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडकडून प्रदीप यांचा ‘ध्रुव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कारामुळे प्रदीप यांच्या पंखाना खऱ्या अर्थाने बळ मिळाले.

गॅरेजमधून मिळणारे पैसे प्रदीप यांनी हेलिकॉप्टरनिर्मितीमध्ये लावले आहे. हेलिकॉप्टरसाठी त्यांनी ४० लाखांपर्यंत खर्च केले असून सध्या त्यांनी सहा मॉडेल तयार केले आहे. प्रदीप यांनी तयार केलेले सध्याचे हेलिकॉप्टर हे ३०० फूट वर आणि ५० किलोमीटर फिरू शकते अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडचे पायलट आणि अधिकाऱ्यांनी प्रदीप यांना दिली. या कामात प्रदीप यांना त्यांच्या फौजी मित्राचीही मदत झाली. प्रदीप यांना रमेश यांनी आर्थिक मदतही केली. प्रदीप हे पायलट नसल्याने हेलिकॉप्टरची चाचणी करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा त्यांचा अपघात झाला. आता भविष्यात लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रदीप यांचा मानस आहे. सरकारने मदत केल्यास ही स्वप्नही प्रत्यक्षात येऊ शकेल, असे त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात प्रदीप मोहिते हे पत्नीसह वास्तव्यास असून ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांना गॅरेजचे सतरा हजार तर घराचे तीन हजार भाडे द्यावे लागते. सरकारने प्रदीप यांच्या कार्याची दखल मदत केल्यास मोदींचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.

First Published on: September 24, 2018 10:16 am