पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया संस्थेला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लशीची निर्मिती पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट करत आहे.
देशात सध्या करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे लस कधी येणार याकडे सगळयांचे लक्ष लागलेले आहे. उत्पादन आणि वितरणासाठी सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. पंतप्रधान मोदी येत्या २८ नोव्हेंबरला SII ला भेट देणार असल्याच्या वृत्ताला पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दुजोरा दिला आहे.
ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये केलेल्या चाचण्यांचे तात्पुरते निष्कर्ष अॅस्ट्राझेनेका कंपनीने सोमवारी जाहीर केले. त्यानुसार या लशीचे दोन वेगवेगळ्या प्रकारे डोस देऊन तिच्या परिणामकारकतेच्या चाचण्या करण्यात आल्या. एका डोस पद्धतीत ९० टक्के परिणामकारकता, तर दुसऱ्या डोस पद्धतीत ६२ टक्के परिणामकारकता आढळली. त्यामुळे दोन्ही चाचण्यांचा विचार करून ही लस ७०.४ टक्के परिणामकारक किंवा प्रभावी असल्याचे सांगण्यात आले.
लशीचे आतापर्यंत चार कोटी डोस तयार
अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.
“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटी डोसचं लक्ष्य ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांनी दिली होती,
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 1:39 pm