21 September 2020

News Flash

नगरसेवक सापडले!; बॅनरबाजीतून पुणेरी ‘टोला’

महापालिका प्रशासनाने बॅनर हटवला

पुणे: 'नगरसेवक सापडले' अशा आशयाचा झळकलेला बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.

‘पुणे तिथे काय उणे’ असे नेहमीच म्हटले जाते. पुणे म्हटले की पाटीची चर्चा होणारच, नाही का? आता महापालिका निवडणूक असल्याने रण तापले आहे. राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्योराप, टोले-टोणपे, टीका-प्रतिटीका अशी जुगलबंदी होणार हे नक्की आहे. सजग पुणेकरही काही कमी नाहीत. त्यांनीही लोकप्रतिनिधींना ‘टोले’ हाणण्यास सुरुवात केली आहे. शनिवार पेठेतील वर्तक बागेच्या प्रवेशद्वाराजवळ अशाच प्रकारचा ‘टोले’बाजी करणारा बॅनर आज झळकत होता. ‘नगरसेवक सापडले, ते आलेत आपल्या भेटीला’ असे बॅनरवर लिहिले आहे. हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते आपापल्या परीने मतदारांपर्यंत सभा, गाठीभेटींच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचार करताना राजकीय विरोधक एकमेकांवर तोफा डागत आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी पुण्याचे रण तापले आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच प्रचाराला लागला होता. निवडणुका आल्यानंतर झोपेतून जागे होणाऱ्या काही राजकीय नेत्यांना सजग पुणेकर ‘टोले’ न हाणतील तर नवलच होते. त्यांना झोपेतून जागे करून मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम नागरिकांनी हाती घेतल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात ‘नगरसेवक हरवले आहे’ असा बॅनर झळकला होता. हा बॅनर सर्वांच्या चर्चेचा विषय झाला होता. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून हा बॅनर पाहण्यासाठी लोक येत होते. त्यामुळे पुढील काळात झोपेत असलेल्या काही लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी जोरदार ‘बॅनर’बाजी सुरू होईल, हे स्पष्ट झाले होते. या बॅनरची चर्चा थांबते न थांबते तोच, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच आज शनिवार पेठेतील वर्तक बागेच्या प्रवेशद्वाराजवळील विजेच्या खांबावर बॅनर झळकला. ‘नगरसेवक सापडले, ते आलेत आपल्या भेटीला…२०१२ ते २०१७ नगरसेवक हरवले. २०१७ मध्ये नगरसेवक सापडले.’, असे या बॅनरवर लिहले होते. हा बॅनर सकाळी बागेत आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. बागेत येणारे-जाणारे नागरीक या बॅनरजवळ काही वेळ थांबून वाचत होते. तर काही जण या बॅनरची ‘आयडियाची कल्पना’ कुणाची आहे, अशी विचारणा करून त्याचे कौतुक करत होते. आता असा बॅनर झळकल्यानंतर चर्चा तर होणारच. त्याची माहिती महापालिका प्रशासनाकडे पोहोचली. अतिक्रमण विभाग तातडीने तिथे पोहोचले आणि त्यांनी बॅनर काढला. विजेच्या खांबावर लागलेले बॅनर या पुढील काळात उमेदवाराच्या घराबाहेर लागतील की काय, अशी सध्या जोरदार चर्चा आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी उमेदवारांना यांसारख्या माध्यमातून योग्य तो संदेश देण्याचा पुणेकरांकडून प्रयत्न केला जातो, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 2:38 pm

Web Title: pmc election pune citizens banners pinch on political leaders
Next Stories
1 फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बापटांची जीभ घसरली
2 ‘आरटीओ’त नव्या संगणकप्रणालीच्या गोंधळामुळे अडचणींत भर
3 साहित्य अकादमीचा सन्मान कसा परत करणार?
Just Now!
X