ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या डीएसके ग्रुपचे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबईतील निवासस्थान आणि कार्यालयात गुरुवारी पुणे पोलिसांनी छापे घातले. त्यात गुन्ह्य़ाशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणात आजपर्यंत ३५१ ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले असून, सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती गुन्हे (आर्थिक आणि सायबर) शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

या संदर्भात फिर्याद दाखल होताना सुरुवातीला ४१ ठेवीदारांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. १ ऑक्टोबपर्यंत २५८, तर २ नोव्हेंबपर्यंत एकूण ३५१ ठेवीदारांनी तक्रारअर्ज दाखल केले आहेत.

या प्रकरणाच्या तपासात चार विशेष पथकांनी गुरुवारी कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयात एकाच वेळी छापे घालून काही पुरावे हस्तगत केले.

संबंधित प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली एक विशेष तपास कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

तपास शीघ्रगतीने होण्यासाठी या कक्षामध्ये पाच पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, तर पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह २० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

संगम पुलाजवळील आर्थिक गुन्हे शाखा येथे हा कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. तपास पथकात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सहायक सरकारी वकील, निवृत्त शासकीय लेखापरीक्षक आदींचा समावेश करण्यात आला आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत बैठक घेण्यात येणार आहे.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे आणि सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे या प्रकरणी तपास करीत आहेत.

‘डीएसकें’विरुद्ध अखेर मुंबईतही गुन्हा दाखल

मुंबई : बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या डीएसकेंनी केलेल्या फसवणुकीविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तब्बल अडीचशे गुंतवणुकदारांची चार कोटी २८ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तूर्तास गुन्हा दाखल झाला आहे. फसलेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी याआधीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडूनहा गुन्हा पुणे पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे. एकाच यंत्रणेने कार्यवाही करावी, या हेतूने असा निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते. डी. एस. कुलकर्णी उद्योगसमुहाची मुदत ठेवींची जाहिरात वाचून हे गुंतवणूकदार भुलले होते. पुणे येथील घरकुल लॉन्स येथे झालेल्या सेमीनारमध्ये या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनेला रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती. त्यावर विश्वास ठेवून शेकडो वयोवृद्ध नागरिक तसेच महिलांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर सुरुवातीला व्याज मिळाले. मात्र गेले वर्षभर व्याज मिळणे बंद झाले होते. त्यावेळी स्वत: डी. एस. कुलकर्णी यांच्या वतीने पत्र पाठवून माहिती देण्यात आली होती. पुढील तारखांचे धनादेशही देण्यात आले. परंतु धनादेश न वटल्याने गुंतवणूकदार हैराण झाले. तरीही लवकरच पैसे देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. पोलिसांकडे जाऊ नका. त्यामुळे माझा विनाकारण वेळ जाईल. न्यायालयात गेलात तर न्यायालयीन आदेशानुसार मला कारवाई करावी लागेल. त्यात किती वेळ जाईल याची कल्पना देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आता इतके वेळ थांबला तर आणखी काही काळ कळ सोसा, असेही डी. एस. कुलकर्णी यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले होते. परंतु तरीही काहीही न झाल्याने मुंबईतील दीडशे गुंतवणूकदारांनी अखेर आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेल्पलाइन क्रमांक आणि व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप

फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या मदतीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत ०२०-२५५४००७७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे तपासाबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी आणि अफवांपासून दूर ठेवण्यासाठी संबंधित ठेवीदारांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपही तयार करण्यात येणार आहे. फसवणुकीबाबत तक्रार देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहून तयार अर्जात माहिती भरून द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिरेमठ यांनी केले आहे.