पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर तेथील भाजपाचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर पूजाचा मोबाईल, लॅपटॉप चोरीचे आरोप केले जात आहे. मागील काही दिवसांपासून घोगरे यांच्यावर अनेक आरोप केले जात असतानाच आज घोगरे यांनी यासंदर्भात खुलासा केलाय. माझ्याकडे कोणत्याही वस्तू नाहीत. मोबाईल देखील पोलिसांकडे देण्यात आला आहे, असं घोगरे यांनी स्पष्ट केलं आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी रविवारी वनमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला. मात्र ज्या दिवशी पूजाने आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत तिचे दोन मित्र होते. त्याचप्रमाणे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे हे देखील या ठिकाणी पोहचले. त्या घटनेनंतर पूजा चव्हाण आणि संशयित आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप, फोटोज सोशल मीडियावर काही तासांमध्ये व्हायरल झाले. मात्र घटनास्थळी असलेला मोबाई, लॅपटॉप आणि ऑडिओ क्लिप भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनीच व्हायरल केल्याचा आरोप बीड मधील शिवसेनेच्या नेत्याकडून करण्यात आला.
याच आरोपांवर भाजपचे नगरसेवक घोगरे यांनी खुलासा करताना, माझ्या घरापासून १०० फुटांवर असलेल्या ठिकाणी सात तारखेच्या पहाटेच्या सुमारास कोणी तरी उडू मारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मी एक नगरसेवक म्हणून घटनास्थळी धाव घेतली. त्याच क्षणी आम्ही संबधित तरुणीला एका रिक्षातून जवळच्या रूग्णालयात पाठवले. तेव्हा पूजा चव्हाण या तरुणीचे मित्र अरुण राठोड आणि विजय चव्हाण हे दोघे देखील तेथे होते. तेव्हा त्यांचाकडे आम्ही चौकशी केली तेव्हा उडी मारणाऱ्या तरुणीचे नाव पूजा चव्हाण असे असल्याचं समजलं, असं म्हटलं आहे.
या मुलीला रिक्षाने रुग्णालयात पाठवून दिल्यानंतर संबंधित घटनेची माहिती मी एक जागरूक नागरिक या नात्याने पोलिसांना १०० क्रमांकावर कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन पुढील कार्यवाही केली, असंही घोगरे यांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणात माझ्यावर अनेक आरोप करण्यात येत आहे. मात्र मी मोबाईल किंवा लॅपटॉप मी चोरलेला नाही. घटना उघडकीस आली त्याच वेळेस मोबाईल पोलिसांकडे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सोशल माध्यमावर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्या मी व्हायरल केलेल्या नाही. मी एक नागरिक म्हणून मदत केली असल्याचे घोगरे यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं.
माझ्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आता कायद्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असा इशाराही घोगरे यांनी दिलाय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 4, 2021 5:05 pm