पुण्यातील उच्चभ्रू वस्त्या व महाविद्यालयांच्या आवारामध्ये मेफ्रेडॉन (एमडी) या अत्यंत महाग अमली पदार्थ विक्रीचे जाळे मोठे असल्याचे यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. शहरातील आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा नायजेरियन विळखा पुन्हा एकदा उघड झाला असून, अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला या प्रकरणी गजाआड केले आहे. यापूर्वीही चार ते पाच प्रकरणात नायजेरियन व्यक्ती पकडण्यात आल्या आहेत, मात्र अद्यापही हे सत्र सुरूच असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.
शहरामध्ये मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा व्यापार वाढल्याचे पकडलेल्या गुन्हेगारांवरून स्पष्ट झाले आहे. या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थामध्ये मेफ्रेडॉनचा वापर सर्वाधिक प्रमाणात असल्याचेही उघड झाले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून होणाऱ्या कारवाईमध्ये अलीकडच्या काळात हाच अमली पदार्थ मोठय़ा प्रमाणावर सापडत आहे. केवळ एका ग्रॅमला तीन ते चार हजार रुपयांहून अधिक किंमत असणारा हा अमली पदार्थ विक्रीसाठी शहरातील उच्चभ्रू वस्त्या व महाविद्यालयांचा परिसर लक्ष्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या विक्रीच्या गुन्ह्य़ामध्ये सापडणाऱ्या व्यक्ती या प्रामुख्याने नायजेरियन असल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे.
खडक पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईतही मॅफ्रेडॉन विक्रीतील आरोपी हा नायजेरियन नागरिक आहे. पोलीस कर्मचारी अतुल भिंगारदिवे यांना खबऱ्याच्या माध्यमातून या आरोपीची माहिती मिळाली होती. पूना कॉलेजसमोर एक निग्रो व्यक्ती मॅफ्रेडॉन विक्रीसाठी येत असल्याची ही माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा लावला व त्याला ताब्यात घेतले. सॅम्युएल न्यूझे (वय २८, सध्या रा. मिरा रोड, ख्रिश्चन बिल्डिंग, ठाणे. मूळ रा. लॅकी अॅबनीस्ट्रीट स्टेट, लेगॉस, नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी बहात्तर हजार रुपये किमतीचा चोवीस ग्रॅम मॅफ्रेडॉन जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत यापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे हा आरोपी व्यवसायाचा व्हिसा मिळवून भारतात आला असून, जुलैमध्ये त्याच्या व्हिसाची मुदत संपत आहे.
संबंधित आरोपी अमली पदार्थ विक्रीच्या टोळीशी संबंधित असावा व त्याचे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार त्याचे साथीदार शोधणे, मॅफ्रेडॉन कोठून आणला याचा शोध घेणे, मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचणे, आणखी मॅफ्रेडॉन विक्री कुठे केली का, याची माहिती घेण्यासाठी पोलिासांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करीत न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सहायक पोलीस उपायुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खडकचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, निरीक्षक (गुन्हे) विवेक मुगळीकर, संभाजी शिर्के, तपास पथकाचे निरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, कर्मचारी सर्फराज शेख, सुरेश सोनवणे, महेंद्र पवार, अतुल भिंगारदिवे, अनिकेत बाबर, इम्रान नदाफ यांनी ही कामगिरी केली.