विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

पुणे : पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याने सर्दी, खोकला, ताप, सारी आजारांमध्ये वाढ होणार आहे. नवरात्र, दिवाळी आणि नाताळ यांसारखे मोठे सण आणि टाळेबंदी शिथिलता अंतर्गत सर्वच क्षेत्रे खुली होत आहेत. परिणामी पुण्यात डिसेंबर, जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या रुग्णसंख्या कमी होत असली, तरी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत महापालिका आणि कटक मंडळांसह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १६ टक्के  आहे.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर के ंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना आल्या आहेत. दरवर्षी थंडीमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि सारी या आजारांमध्ये वाढ होत असते. त्यानुसार यंदा थंडीमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नवरात्र, दिवाळी आणि नाताळ या मोठय़ा सणांनिमित्त नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. यासह राज्य सरकारकडून टाळेबंदीत मोठय़ा प्रमाणात शिथिलता आणण्यात येत असून बहुतांशी सर्वच क्षेत्रे सुरू करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर डिसेंबर, जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.’

दरम्यान, दुसरी लाट पहिल्याप्रमाणे तीव्र नसेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत ठाम माहिती अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे, शारीरिक अंतर राखणे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे, असेही राव यांनी सांगितले.

‘पुण्याचा निर्धार करोना हद्दपार’ मोहीम

‘माझे कु टुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा पहिला टप्पा १० ऑक्टोबरला संपला आहे. या टप्प्यात ९१ टक्के  नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा १४ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून यामध्ये ‘पुण्याचा निर्धार करोना हद्दपार’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करोना बचावाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानुसार दृकश्राव्य माध्यमांतून चलचित्रफिती दाखवणे, ३०० बस गाडय़ांवर फलक लावणे, शाळा, रुग्णालये, मंडई या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे, असेही राव यांनी सांगितले.

करोनाचा आलेख सध्या स्थिर

दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (कटक मंडळांसह) प्रमाण १६ टक्के  आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हे प्रमाण ३१ टक्के , अखेरीस २६ टक्के  होते, तर सप्टेंबरच्या सुरुवातीला हेच प्रमाण २५ टक्के  आणि अखेरीस २३.५० टक्के  एवढे होते. त्यानुसार दररोज चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या तरी स्थिर आहे, असे राव यांनी सांगितले.