सत्ता संपादनासाठी काही जातींचे एकत्रीकरण करायचे आणि सत्तेवर आल्यानंतर उर्वरित जातींशी दुजाभाव करायचा, असे समाजामध्ये भेग पाडण्याचे कारस्थान मोडून काढले पाहिजे, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले. जातविरहीत समाजरचना हाच त्यावरचा उत्तम उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलन या दोन मंचांच्या स्थापनेनिमित्त समता भूमी येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. भारत पाटणकर, गौतमीपुत्र कांबळे, किशोर जाधव, धनाजी गुरव, भीमराव बनसोड, प्रकाश रेड्डी, अरिवद देशमुख आणि साहित्यिक वाहरु सोनवणे या वेळी उपस्थित होते.
जातीमुक्त समाजासाठी मानसिकता बदलण्याचा हा लढा दीर्घकालीन असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकर म्हणाले, जात आणि जातीयतेच्या बळावर काही संघटना जोम धरीत आहेत. कामगार संघटना असो किंवा राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या अस्तित्वावरच जातीने घाला घातला आहे. हे जातीयतेचे तण उखडून काढताना समाजाचा जातीविरहीत पाया असणे गरजेचे आहे.
वाहरु सोनवणे म्हणाले, आदिवासी हे धर्मपूर्व श्रद्धा मानणारे आहेत. सर्व धर्म हे विषमतेचा पुरस्कार करणारे असल्याने घरवापसी करायची असेल तर, माणसाला त्याच्या मूळ धर्माकडे जावे लागेल.
भारत पाटणकर यांनी प्रास्ताविकामध्ये या दोन्ही मंचाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. नागपूर येथील दीक्षाभूमी येथून प्रारंभ करून जातीमुक्तीसाठी राज्यात लातूर, सोलापूर, नंदूरबार, रत्नागिरी, सोलापूर येथे प्रचार दौरे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.