पुणे : शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये इतर जिल्ह्य़ांमधील करोनाचे रुग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. अशा रुग्णांचे प्रमाण तब्बल २५ टक्के  एवढे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. परिणामी पुण्यातील करोना बाधितांना खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, लक्षणे नसलेल्या, मात्र करोना बाधित असलेल्या रुग्णांना घर मोठे असल्यास घरी किं वा करोना काळजी केंद्रात पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही खासगी रुग्णालये ‘करोना रुग्णालये’ म्हणून घोषित के ली जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयातील उपलब्ध सुविधा आणि खाटांबाबतची माहिती दररोज डॅशबोर्डवर अद्ययावत करणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे.   तसेच गृह विलगीकरण के लेल्या रुग्णांसाठी उपलब्ध असलेला औषधांचा साठा, रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या कामाचे वेळापत्रक आणि त्यांची निवासव्यवस्था, अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड), कृत्रिम श्वसन यंत्रणा व्यवस्था (व्हेंटिलेटर) या सर्व बाबींची माहिती दररोज संकलित करण्यात येत आहे. त्यामध्ये काही रुग्णालयांमध्ये पुणे जिल्ह्य़ाबाहेरील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील करोना बाधितांवर वेळीच उपचार होणे, खाटा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुण्यातील रुग्णांना प्राधान्य देण्याच्या सूचना के ल्या आहेत.

लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश

शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पुणे जिल्ह्य़ाबाहेरील म्हणजेच सोलापूर, नगर, सातारा, लातूर या जिल्ह्य़ांमधील करोना बाधितांवर उपचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतर जिल्ह्य़ांमध्ये उपचारांची सुविधा पुण्यापेक्षा चांगली नसल्याचे संबंधित रुग्णांना वाटत असल्याने ते शहरातील खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. अशा रुग्णांचे प्रमाण २५ टक्के  एवढे आहे. मात्र, पुण्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी किं वा करोना काळजी केंद्रात पाठवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रामुख्याने पुणे जिल्ह्य़ातील रुग्णांवर उपचार करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ पुण्याबाहेरील रुग्णांवर उपचार करण्यात येऊ नये, असे नाही. मात्र, प्राधान्य पुणेकरांनाच दिले पाहिजे.

– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी