नव्या वर्षांत लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उप लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे पुणेकर असल्याने पुण्यासाठी हा अभिमानाचा विषय ठरला आहे. सध्या नरवणे हे पुण्यामध्ये असून शुक्रवारी ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे नितीन गोखले यांनी लिहिलेल्या ‘आर. एन. काव – जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी नरवणे यांचा ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असणाऱ्या नरवणे यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती होत असल्याने हा सत्कार कऱण्यात आला. यावेळी नरवणे यांनी पुण्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

आपल्या शाळेकडून झालेला सत्कार स्वीकारल्यानंतर नरवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी बरीच वर्ष महाराष्ट्राबाहेर असल्याने मराठीत बोलताना अडखळायला होतं असं नम्रपणे सांगितलं. “आज सकाळीच मी बायकोला फोन करुन शाळेकडून माझा सत्कार होणार असून तेथे जाणार आहे असं सांगितलं. त्यावेळी तिने मला काहीही कर पण मराठीमध्ये बोलू नकोस असा सल्ला दिला. माझी मराठी भाषा आता खूपच बिघडली आहे. त्यात पुण्यात बोलायचं म्हणजे नेमकं आणि नीट बोलावं लागतं,” असं नरवणे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “मराठीत बोलताना काही कमी जास्त झाल्यास उगच अडचण नको या भितीने माझ्या बायकोनं मला हा सल्ला दिला असावा. आता लष्करप्रमुख होणार असलो तरी बायकोचं मात्र प्रत्येकालाच ऐकावंच लागतं,” असंही नरवणे म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा सभागृहामध्ये जोरदार हशा पिकला. ज्ञानप्रबोधिनीचं यंदा हिरकमोहोत्सवी वर्ष आहे. याच निमित्ताने नरवणे यांच्या सत्कारसमारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दीड हजार आजी-माजी विद्यार्थी हजर होते.

गुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे

शनिवारी झालेल्या ‘आर. एन. काव – जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तक प्रकाश सोहळ्यामध्ये बोलताना नरवणे यांनी “सैन्य दलांच्या मोहिमा यशस्वी होण्यात गुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असते,” असं मत व्यक्त केलं. “गुप्तचर यंत्रणा म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर जेम्स बॉण्ड आणि त्याचे गन्स, गिटार, ग्लॅमर हे बॉण्डपटातील चित्र येते. मात्र ते चुकीचे आहे. कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि नेहमीच पडद्यामागे राहणाऱ्या या गुप्तहेरांचे देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे योगदान असते. सैन्यदलांची कोणतीही मोहीम गुप्तचर विभागाने पुरवलेल्या माहितीशिवाय पूर्ण होत नाही. सैन्यदलांना नेहमीच शत्रूच्या गोटातली बित्तंबातमी हवी असते, ती पुरवण्याचे महत्त्वाचे काम गुप्तचर यंत्रणा करतात. ‘रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ देखील असेच सहकार्य सैन्यदलांना करत आली आहे. त्यामुळे सैन्यदलांच्या मोहिमांमध्ये गुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असते,” असे प्रतिपादन नरवणे यांनी यावेळी बोलताना केले.

नवरणे आणि पुणे…

मूळचे पुण्याचे असलेल्या मनोज नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या वृत्तनिवेदक होत्या. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी १९८० मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७ व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. मनोज नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांना आतापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वी पुण्याचे जनरल अरुणकुमार वैद्य यांनी लष्करप्रमुखपद भूषवले होते. नरवणे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.