केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात आंदोलन केले जात असून पुण्यात देखील त्याचे पडसाद उमटले. आज पुण्यात महाविकास आघाडीतील शहर पातळी वरील नेते मंडळी सहभागी झाले होते. मात्र या आंदोलन दरम्यान माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीचा फोटो हाती घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. पण काही वेळातच तो फोटो, चौकात असलेल्या सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो बराच वेळ तसाच पडून राहिला.

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ मध्ये ‘जय जवान जय किसान’ हा नारा देत, शेतकरी वर्गाला एकत्र आणण्याचं काम केले. आता त्या घटनेला जवळपास ५५ वर्षे झाली आहेत. केंद्र सरकारने कृषी कायद्या विरोधात पंजाब, हरयाणा येथील शेतकरी दिल्ली येथे मागील १२  दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनास देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून आज पुण्यातील अलका चौकात महा विकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य संघटना शहर पातळीवरील न सकाळी १० वाजल्यापासून सहभागी झाले होते. कृषी कायद्या विरोधात अलका चौक ते मंडई पर्यंत मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवनगी नाकारल्याने, आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.

या आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो आंदोलन ठिकाणी आणला. पण आंदोलनकर्ते प्रत्येक जण सेल्फी काढण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो एक दुसऱ्याकडे देताना दिसत होते.  एका कार्यकर्त्याच्या लक्षात येताच, त्याने तो फोटो हातामध्ये धरण्यास सांगितला. पण ज्या व्यक्तीने लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो हातामध्ये धरला. त्याचा फोटो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामध्ये येत नसल्याने अखेर त्याने तो फोटो सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर ठेवला. तो फोटो जवळपास त्या ठिकाणी तासभर तसाच होता. यामुळे ज्या लाल बहादूर शास्त्री यांनी शेतकरी वर्गासाठी लढा उभारला. त्यांचा विसर आंदोलनकर्त्यांना पडल्याचे दिसून आले.