पुणे  : धृपद आणि ख्याल अंगाने वादन करणारे ज्येष्ठ सतारवादक आणि रुद्रवीणावादक पं. हिंदराज दिवेकर (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. ते ज्येष्ठ रुद्रवीणावादक हिंदगंधर्व पं. शिवरामबुवा दिवेकर यांचे पुत्र, तर नटश्रेष्ठ चिंतुबुवा दिवेकर यांचे नातू होत.

दिगंबर शिवराम दिवेकर हे हिंदूराज यांचे मूळ नाव. ४ डिसेंबर १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. पिता हिंदूगंधर्व दिवेकर आणि पं. भास्कर चंदावरकर यांच्याकडून त्यांना सतारवादनाची तालीम मिळाली. त्यानंतर उज्जन येथील पं. मंगल प्रसाद आणि उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पिता हिंदूगंधर्व दिवेकर, पं. पंढरीनाथ कोल्हापुरे आणि उस्ताद झिया मोहीउद्दीन डागर यांच्याकडून त्यांना धृपद अंगाने रुद्रवीणावादनाची तालीम मिळाली. तर, ख्याल अंगाने वादनासाठी त्यांना पं. बिंदूमाधव पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. पं. हिंदूराज दिवेकर यांच्या भारतासह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली आणि सिंगापूर येथे रुद्रवीणावादनाच्या मैफली झाल्या होत्या. पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातून त्यांनी संगीत विशारद पदवी संपादन केली होती.