राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ताण हलका करणारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, पाच रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात एकाच कुटुंबात राहणाऱ्या ५ जणांना करोनाची लागण झाली होती. करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. करोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे १४ दिवसांनंतर त्यांच्या पुन्हा टेस्ट करण्यात आल्या. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पुणे शहरात एकूण २३ जण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात १,१३५ जण करोनाग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी ११७ जण करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.