देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. राज्यात करोना रुग्ण वाढीमध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. शहरात करोनाबाधितांची वाढत असलेली संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशानस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये करोना योद्धे समजल्या जाणारे पोलीस देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेदिवस करोनाचा संसर्ग होतांना दिसत आहे. तर, अनेकांना आतापर्यंत जीव देखील गमावावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका १६ वर्षीय मुलाने आपल्या पॉकेट मनीमधून पोलिसांसाठी चार सॅनिटायझर यंत्र भेट दिल्याचे कौतुकास्पद कार्य समोर आले आहे.

रेहान गोयल असे या मुलाचे नाव असून त्याने पॉकेट मनीमधून खरेदी केलेले चार सॅनिटायझर यंत्र परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना भेट दिले.

या पार्श्वभूमीवर रेहान गोयल याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाले की, मागील सात महिन्यांपासून आपल्या शहरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित आढळत आहेत. त्या दरम्यान समाजातील विविध घटक पुढे येऊन काम करताना दिसत आहेत. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे रात्रंदिवस काम करीत असून, त्यांच्यामध्ये देखील दररोज बाधित रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय करता येईल? असा विचार केला. तेव्हा त्यांच्याकडे येणार्‍या फाईल्स आणि जवळील वस्तू निर्जंतुक होण्यास मदत होणारे यंत्र देण्याची कल्पना डोक्यात आली व त्यानुसार मी निर्णय घेतला. हा विचार मी माझ्या कुटुंबीयांना सांगितला , तेव्हा सर्वांनी मला माझ्या कामास प्रोत्साहन दिले. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली व मी माझ्या पॉकेट मनीमधून चार यंत्र खरेदी करून त्यांच्याकडे सोपवले.

तसेच तो पुढे म्हणाला की, आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र रस्त्यावर काम करीत आहे. त्या दृष्टीने सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे. तसेच या करोना विरोधीतील लढ्यात प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दररोज दहा करोनाबाधित संवाद –
माझ्या कुटुंबात देखील काही जणांना करोनाचा संसर्ग झाला होता. ते त्यामधून बाहेर देखील पडले आहेत. त्यावेळी सर्व जण त्यांच्याशी संवाद साधत होते. हे पाहून आपण देखील जे काही समाजातील नागरीक करोनाबाधित आढळत आहेत. अशा रुग्णांसोबत फोनद्वारे संवाद साधावा, म्हणून मी पुणे महापालिकेच्या कोविड विभागा सोबत चर्चा केली. त्या विभागा मार्फत दररोज, दहा लोकांचे नंबर मिळतात. त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत चौकशी करतो. या कामातून वेगळेच समाधान मिळत असल्याची भावना रेहान गोयल याने व्यक्त केली. तसेच, अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही त्याने केले. या संवादामुळे जे बाधित रुग्ण आहेत. ते आजारातून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होत असल्याचे तो म्हणाला.

पोलिसांना कागदपत्र देताना सॅनिटाइझ करावीत – पंकज देशमुख
पोलीस विभागात काम करत असताना पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रं हाताळावी लागतात. पोलीस स्टेशन व चौकी पातळीवर नागरिकांमार्फत विविध प्रकारची कागदपत्रं येत असतात. या कागदपत्रांवर देखील करोना विषाणू असण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कागदपत्रांना सॅनिटाइझ करणारा बॉक्स जो करोना विषाणूंना मारतो. अशाप्रकारचे चार बॉक्स आम्हाला रेहान गोयल या विद्यार्थ्याने दिले आहेत. माझं नागरिकाना आवाहन आहे की, नागरिकांनी पोलिसांना कागदपत्र देत असताना त्यांनी ते सॅनिटाइझ करावीत. अशाप्रकारची मदत इतर नागरिकांकडूनही झाली तर त्याचं स्वागतच आहे. असे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले आहे.