वापरकर्त्यां दोन लाख प्रवाशांना सेवा विस्ताराची प्रतीक्षा

पुणे : पुणे-लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेने सुरू केलेल्या पुणे विभागातील पहिल्या उपनगरीय रेल्वे सेवेने सोमवारी (११ मार्च) बेचाळिसाव्या वर्षांत पदार्पण केले. सद्य:स्थितीत दररोज दोन लाखांच्या आसपास प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून, दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे या सेवेच्या विस्ताराच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत. गेल्या ४१ वर्षांमध्ये काही फेऱ्यांची वाढ, गाडीचा वेग, डब्यांची वाढलेली संख्या आदी गोष्टी वगळता सेवेत मोठय़ा सुधारणा झाल्या नसल्याचे वास्तव आहे.

मुंबई शहरामधील उपनगरीय रेल्वे सेवेच्या धर्तीवर पुणे आणि लोणावळा या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान ११ मार्च १९७८ रोजी पुणे- लोणावळा लोकल सुरू झाली. एकेकाळी ‘भुंडी लोकल’(स्वतंत्र इंजिन नसलेली) म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गाडीच्या सेवेमुळे परिसराच्या विस्ताराला आणि प्रगतीलाही हातभार लागला आहे. पुणे, िपपरी-चिंचवड शहर, मावळ परिसरासह आजूबाजूच्या विभागांना या सेवेचा फायदा झाला आहे. सद्य:स्थितीत नोकरदार, विद्यार्थी, छोटे व्यापारी आदींसाठी ही सेवा महत्त्वाची आणि उपयुक्त ठरते आहे. सध्या पुणे ते लोणावळा आणि तळेगाव दरम्यान लोकलच्या दिवसभर ४४ फेऱ्या होतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांत गाडीच्या डब्यांची संख्या सहा आणि नऊ वरून बारा करण्यात आली आहे. डब्यांची संख्या वाढवूनही ही सेवा अपुरी पडत असल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी सातत्याने करीत आहेत.

पुणे ते मुंबई लोहमार्गावर इतर गाडय़ांचा असलेला भार लक्षात घेता लोकलच्या विस्तारात मर्यादा असल्याची बाब रेल्वेकडून सातत्याने स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम करण्यात येत आहे. त्यातून गाडय़ांचा वेग वाढून काही फेऱ्या वाढविता येऊ शकतात. पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या विस्ताराचा प्रकल्प लोकलची सेवा विस्तारण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी सातत्याने तुरळक निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लोहमार्गालगतच्या जमिनीही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. मात्र, त्याबाबत सध्या तरी कोणतीही तत्परता दिसून येत नाही.

सकाळी आणि संध्याकाळी लोकलच्या कोणत्याही डब्यात अनेकदा पाय ठेवायलाही जागा नसते. अशा वेळी प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या दोन्ही वेळेला लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. लोहमार्ग विस्तारापूर्वी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण करून फेऱ्या वाढविणे शक्य असल्याने रेल्वेने  हे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना काहीसा दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुणे-लोणावळा लोकलच्या उपनगरीय सेवेचा विकास गेल्या ४१ वर्षांत हवा तसा झालेला नाही. प्रवाशांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या नाहीत. सेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक लोहमार्ग विस्ताराचा प्रकल्पही अद्याप जागेवरच आहे. मात्र, आहे त्याच मार्गावरही लोकलच्या फेऱ्या वाढविणे शक्य असून, रेल्वेने त्याबाबतचे नियोजन केले पाहिजे. त्याचप्रमाणे लोणावळा ते दौंड अशी थेट लोकलसेवा सुरू केल्यास सुमारे दहा लाखांहून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकेल.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा