28 September 2020

News Flash

यंदा दहीहंडी फुटणार नाही

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचलित सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : एकावर एक थर रचून गोविंदांची दहीहंडी फोडण्याची सुरू असलेली लगबग.. अत्याधुनिक ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाशझोत, चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची उपस्थिती अशा उत्साही वातावरणातील दहीहंडी उत्सव यंदा अनुभवता येणार नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा दहीहंडी उत्सवावरील मोठा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.

दहीहंडी उत्सव अवघ्या आठ दिवसांवर (१२ ऑगस्ट) येऊन ठेपला आहे. शहरातील अनेक गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सव दिमाखदारपणे साजरा केला जातो. मंडळांतील कार्यकर्त्यांचा संच दहीहंडी उत्सवासाठी राबत असतो. केवळ शहराच्या मध्य भागातच नव्हे तर कोथरूड, कर्वेनगर,  बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, हडपसर, वडगाव शेरी, औंध, पाषाण, बाणेर अशा उपनगरांमध्येही दरवर्षी दहीहंडी उत्साहाने साजरी होते. करोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीने जमा होण्यावर ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध असल्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव होणार नाही. करोना संकटाची तीव्रता ध्यानात घेऊन यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सेवा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

गर्दी टाळण्याच्या उद्देशातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचलित सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. दहीहंडी उत्सवासाठी राखून ठेवलेला एक लाख रुपयांचा निधी ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या भोजन सुविधेसाठी देण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम

गर्दी टाळण्याच्या उद्देशातून खजिना विहीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दहीहंडी उत्सव रद्द केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ओम कासार यांनी सांगितले. ९ ते १२ ऑगस्ट असे चार दिवस देहविक्रय करणाऱ्या महिलांना भोजनाची सुविधा देण्यात येणार असून आंबेगाव येथील क्रांती आदिवासी विद्यालयातील दीडशे मुला-मुलींना वह्य़ावाटप करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी (१२ ऑगस्ट) पाच हजार नागरिकांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. मंडळातर्फे सध्या सदाशिव पेठ भागातील पाच इमारतींचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असे कासार यांनी सांगितले.

गोविंदांचा सरावही थांबला

कसबा पेठ येथील भोई आळी परिसरात गोविंदा पथके आहेत. दहीहंडी उत्सवापूर्वी महिनाभर आधी दररोज रात्री या भागात युवकांचा सराव सुरू असतो. यंदा मात्र, हा सराव थांबला आहे. पुण्यासह बारामती, इंदापूर, मुंबई येथील गोविंदा पथके दरवर्षी दहीहंडी उत्सवामध्ये आवर्जून हजेरी लावतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:39 am

Web Title: pune mandal not to celebrate dahi handi festival zws 70
Next Stories
1 डिजिटल स्वाक्षरीयुक्त खाते उताराही उपलब्ध
2 ‘यूपीएससी’त राज्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
3 राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये ३१ ऑगस्टपर्यंत बंदच
Just Now!
X