निर्णयाचा चेंडू महापालिकेच्या अंगणात

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचे स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठी भुयारी मार्ग (अंडरग्राउंड) आणि उन्नत मार्ग (इलेव्हेटेड) असे दोन्ही प्रस्ताव महामेट्रोकडून महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव सादर करताना खर्च, रस्त्याची लांबी या बाबींचा विचार करून भुयारी मार्गाला महामेट्रोकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेसाठी कोणता पर्याय स्वीकारायचा या निर्णयाचा चेंडू महापालिकेच्या अंगणात आला असून महापालिकेने मार्ग निश्चितीचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक पर्यायांचा विचार सुरू होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे स्वारगेटच्या बाजूने विस्तारीकरण करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका भाजपच्या लोकप्रतिनिधींनी घेतली होती. त्यानुसार पालिकेनेही तसा प्रस्ताव मंजूर करून तो महामेट्रोला देत या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यासाठी साठ लाख रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली होती. तेव्हापासून हा मार्ग उन्नत की भुयारी याबाबत चर्चा सुरू झाली होती. या पाश्र्वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दोन्ही प्रस्ताव महापालिकेला सादर केल्याची माहिती देतानाच भुयारी मार्गाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले.

मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणासंदर्भातील दोन्ही प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. उन्नत आणि भुयारी मार्गासाठी येणारा खर्च, एकूण लांबी याबाबतची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. सध्या भुयारी मार्गाला महामेट्रोकडून प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय महापालिकेने घेणे अपेक्षित आहे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

स्वारगेट-कात्रज या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा प्राथमिक टप्प्यात पूर्ण झाला आहे. महापालिकेने मार्गनिश्चिती केल्यानंतर त्याबाबतच्या आर्थिक पर्यायांवर विचार सुरू करण्यात येईल. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारी करावयाचा झाल्यास त्याची लांबी सहा किलोमीटर असणार आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. उन्नत मार्गिका केल्यास लांबी वाढणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे.

मार्गिकांना नावे

वनाज ते रामवाडी व स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांच्या नामकरणाबाबतही काही निर्णय महामेट्रोने घेतले आहेत. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड ही मार्गिका पर्पल लाइन म्हणून ओळखली जाईल. तर वनाज ते रामवाडी ही मार्गिका अ‍ॅक्वा लाइन म्हणून ओळखली जाईल.