राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज पुण्यात येणार असून शहरातील विविध भागात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. तर या स्वागतामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांनी चक्क 270 किलोचा हार तयार केला आहे. या हाराची चर्चा पुणे शहरातील राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे.

या हाराविषयी आमदार योगेश टिळेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “राज्याच्या अनेक भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करीत आहेत. आता हीच यात्रा आज पुण्यात येत असून त्याची सुरुवात हडपसर येथून होत आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांना अनोख्या पद्धतीने स्वागत करावे,अशी इच्छा होती.”

“यातच भव्य असा हार तयार करावा, अशी चर्चा मित्रासोबत केली. तेव्हा गुजरातमध्ये यापूर्वी 160 किलोचा हार साकारला गेला होता. तेव्हा 270 किलोचा भव्य हार तयार करण्याचे ठरविले. आता हार तयार करण्यात आला असून या कामासाठी 12 कामगारांच्या मदतीने तीन दिवसात हार तयार करण्यात आला आहे. तसेच हा भव्य हार क्रेनच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांना घातला जाणार आहे,” असेही त्यांनी नमूद केलं.