News Flash

लोकजागर :  करोनाकाळातील गणंग

देशातल्या अनेक मोठय़ा शहरांना जे शक्य झाले, ते अजून पुणे शहराला शक्य झालेले नाही.

संग्रहित छायाचित्र

मुकुंद संगोराम Mukund.sangoram@expressindia.com

पुणे महानगरपालिकेच्या करोना हाताळणाऱ्या यंत्रणा किती मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत आणि आपल्याच पायावर कसा धोंडा पाडून घेत आहेत, याची अनेक उदाहरणे आता पुढे येऊ लागली आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणावर उभारण्यात आलेल्या जम्बो केंद्रातील रुग्णांची हेळसांड ही राजकीय पक्षांसाठी एकमेकांवर शेण फेकण्याची संधीच होती. पण त्यात बळी जातो, तो सामान्य नागरिकांचा. आता हे आणखी एक उदाहरण. सिंहगड रस्त्यावर वारजे येथे पुणे महापालिकेने स्वत:चे साठ खाटांचे सुसज्ज लायगुडे रुग्णालय उभे केले. आत्ताच्या काळात हा भाग सर्वाधिक रुग्ण असणारा असल्याने हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचे. पण कुणा नगरसेवकाच्या सांगण्यावरून तेथील करोना केंद्र बंद करण्याचा गाढव निर्णय घेण्यात आला.

देशातल्या अनेक मोठय़ा शहरांना जे शक्य झाले, ते अजून पुणे शहराला शक्य झालेले नाही. करोनाचा कहर होत असताना, एकत्रितपणे काम करून शहराला या संकटातून बाहेर काढायची कल्पना पुण्यातील राजकारण्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जो तो स्वत:च्या हितसंबंधांची पोळी भाजून घेत राहतो. शहर आणि तेथील रुग्णांची दिवसेंदिवस वाढत राहणारी रुग्णसंख्या गेली खड्डय़ात. शहरातील सगळ्या नगरसेवकांना करोना काळात आपले भले कसे करून घेता येईल, याचीच काळजी. या निमित्ताने एकमेकांची उणीदुणी काढत, एकमेकांचे जुने हिशोब चुकते करण्याची एकही संधी कुणी सोडत नाही. संपूर्ण शहराला एकत्रिपणे बांधून ठेवण्याची गरज कुणाही नेत्याला वाटत नाही. त्यामुळे करोना काळात अशा गणंगांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. करोनाचा देशातील पहिला रुग्ण ज्या पुणे शहरात सापडला, त्या शहरातच अजून करोनाची काळजी कमी झालेली नाही. हे सगळे केवळ सगळ्यांची तोंडे एकमेकाविरुद्ध असल्यामुळे घडते आहे.

पुणे महानगरपालिकेची आरोग्य सेवा किती फडतूस आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले. सामान्यांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा देणारी पालिकेची अनेक आरोग्य केंद्र उत्तम काम करत असतानाही, नगरसेवकांच्या हट्टामुळे त्यामध्ये सातत्याने अडथळे येत राहतात आणि हे काम उत्तम रीतीने होऊ शकत नाही. ज्या सिंहगड रस्त्यावरील एका मोठय़ा गृरचना संस्थेत देशातील पहिला रुग्ण सापडला, तो सिंहगड रस्ता परिसर अजूनही अतिशय धोकादायक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या भागातील अनेक खासगी रुग्णालये करोना केंद्र म्हणून पालिकेने ताब्यात घेतली. पालिकेनेच या परिसरात लायगुडे रुग्णालय उभे केले आहे. तेथे रोज किमान शंभर नागरिक तपासणीसाठी येत असतात. त्यातील गंभीर रुग्णांना तेथेच भरती करता येऊ शकते. पण तेथे प्राणवायू पुरवणारी यंत्रणा नाही. ती तातडीने बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली, तरी ती अजून बसलेली नाही. ती लवकर बसावी, यासाठी संबंधित नगरसेवकांनी प्रयत्न करायला हवेत. ते दूरच. पण तेथे सुरू असलेले करोना तपासणी केंद्रच बंद करण्याचा निर्णय क्षेत्रीय कार्यालयाकडून घेण्यात आला. असे का केले, याचे उत्तर कोणी देत नाही, याचे कारण हा निर्णय चुकीचा आहे, हे कळूनही नगरसेवकाच्या बावळट हट्टामुळे तो घेतला आहे, हे सांगता येत नाही.

आपण कुणासाठी आहोत, याचे भान सुटले की असला गाढवपणा सुचतो. करोना हे भ्रष्टाचाराचे कुरण होऊ लागल्याची भावना नागरिकांमध्ये दिवसेंदिवस बळावते आहे. सुमार दर्जाच्या नेत्यांनी असले काही मूर्ख उद्योग केले, की या भावनेला बळकटीच मिळते. जो तो आपापले हितसंबंध पाहात बसतो, नागरिकांशी कुणालाच काही घेणेदेणे नाही. असल्या गणंगांना सांभाळणाऱ्या नेत्यांनाही त्याबद्दल जराही चाड नाही. हे असेच सुरू राहिले, तर बाकी कशात नसला, तरी करोना रुग्णसंख्येत पुण्याचा नंबर देशात कायमच पहिला राहील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:22 am

Web Title: pune municipal corporation coronavirus in pune lokjagar zws 70
Next Stories
1 संपूर्ण शहरात उद्या पाणी नाही
2 नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सर्वंकष चर्चा
3 पुण्यात प्राणवायूची कृत्रिम टंचाई
Just Now!
X