पुण्यातील धानोरी परिसरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आता या महिलेच्या पतीचा मृतदेह पोलिसांना खानापूर येथे आढळून आलाय. सासवड आणि कात्रच्या नवीन बोगद्याजवळ बुधवारी माय लेकांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस आबिद शेखच्या मागावर असतानाच त्याचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ आणखीन वाढलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिकनिकसाठी गेलेल्या शेख या कुटुंबाची हत्या झाल्याने पुण्यात बुधवारी खळबळ माजली. सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रजजजळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान पती आबिद शेख बेपत्ता असल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया अबीद शेख (वय ३५) आणि आयान शेख (वय ६) यांची हत्या करण्यात आली आहे, तर एका विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारा पती आबिद सुद्धा बेपत्ता होता. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशातील असून पुण्यात लोहगावमधील ब्रुकलिन-प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये वास्तव्यास होतं. काल मायलेकांचा मृतदेह सापडल्यानंतर आज आदिबचाही मृतदेह सापडल्याने नक्की या तिघांसोबत काय घडलं यासंदर्भातील गूढ वाढलं आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

झोन दोनचे उपायुक्त सागर पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धानोरी परिसरात आबिद शेख, पत्नी आलिया व त्यांचा मुलगा आयान असे तिघे जण राहत होते. पती आणि पत्नी हे उच्च शिक्षित होते. पती आबिद हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. तर पत्नी आलिया यांनी मुलगा आयानच्या आजारामुळे अडीच वर्षांपूर्वीच नोकरी सोडली होती. त्याच्यावर उपचार देखील सुरू असताना, आयानला शिकणवण्यासाठी घरीच एक शिक्षिका देखील येत होती. दरम्यान सोमवारी तिघेजण फिरण्यास बाहेर जाणार असल्याने, आबिद चारचाकी गाडी घेऊन आला व त्यानुसार तिघेजण फिरण्यास गेले. मात्र तेथून पुढे, या तिघांचा कोणाला संपर्क झाला नाही. पत्नी आलियाचा मृतदेह सासवड येथे आढळून आला. तर सहा वर्षाच्या आयानचा मृतदेह कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ आढळून आला.

नक्की वाचा >> पुणे हत्याकांडाचे गूढ कायम ; सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता!

मुलाचा गळा दाबून केली हत्या…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयानची गळा दाबून हत्या करण्यात आली असून त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. तर आलियाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली”. दरम्यान कुटुंब सोमवारी हाऊसिंग सोसायटीत गेलं असता कार चुकीच्या जागी पार्क केल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. पुणे शहर, ग्रामीण पोलीस आणि क्राइम ब्रांच युनिट या हत्येचा तपास करत आहे. दरम्यान आबिद अद्याप बेपत्ता असून पोलीस शोध घेत होते. मात्र आज आदिबचा मृतदेह सापडल्याने गूढ आणखीन वाढलंय.

काय घडलं?

प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने पिकनिकला जाण्यासाठी ११ जूनला कार भाड्याने घेतली होती. आबिद यांनी नंतर कारचा कालावधी वाढवून घेतला होता. सोमवारी रात्री ९ वाजता त्यांचं मध्य प्रदेशातील आपल्या कुटुंबासोबत बोलणं झालं होतं. आपण अर्ध्या तासात घरी पोहोचू असं यावेळी त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता. कार परत न आल्याने कार कंपनीचे कर्मचारी हाऊसिंग सोसायटीत पोहोचले होते. यादरम्यान आबिदच्या कुटुंबाकडे सोसायटीने संपर्क साधला असताना कार कंपनीचे कर्मचारीही तिथे आले असल्याचं त्यांना कळालं. यानंतर आदिबच्या नातेवाईकांनी पुण्यातील नातेवाईकाशी संपर्क साधत आबिद आणि इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

गाडीत रक्ताचे डाग…

दरम्यान कार कंपनी कर्मचारी आणि नातेवाईकांनी जीपीसच्या सहाय्याने कारचा शोध घेतला असता सिटी प्राईड येथे पार्क केली असल्याचं आढळलं. रात्री सव्वा एक वाजता ही कार पार्क करण्यात आली होती. कारमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांना पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली एक व्यक्ती…

या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दोन्ही घटना लक्षात घेत, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता ज्या चारचाकी वाहनाने ते तिघे जण फिरण्यास गेले होते ते वाहन सहकारनगर भागात एक व्यक्ती लावून पुढे स्वारगेटच्या दिशेने चालत जात असताना दिसून आली. मात्र ती व्यक्ती नेमकी कोण होती? हे स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये नेमके दिसू शकले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune murder case after mother five year old child fathers dead body found in khanapur svk 88 scsg
First published on: 18-06-2021 at 10:43 IST