अनलॉकच्या माध्यमातून राज्य सरकारने आता काही गोष्टींना हळुहळु परवानगी देण्यास सुरुवात केली असली तरीही महत्वाच्या शहरांना करोना विषाणूचा विळखा आजही कायम बसलेला आहे. पुणे शहरातही दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात शहरात ३६९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ लाख ५८ हजार ७५६ वर गेली आहे. दिवसभरात २१ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले, त्यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा ४ हजार ६६ वर पोहचला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या ८१८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसा अखेरीस १ लाख ४६ हजार ९१२ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पुण्याप्रमाणेच शेजारील पिंपरी-चिंचवड परिसरातही करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कायम आहे. दिवसाभराअखेरीस पिंपरी-चिंचवड शहरात २०० करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १९३ जणांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८६ हजार २९६ वर पोहचली असून पैकी, ८२ हजार ५१० जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ३३६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.