रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) लागणार आहे. या खटल्याची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. आज या खटल्याचा अंतिम निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे. पुणे पोलिसांनी ट्विट करुन पुणेकरांना या खटल्याच्या निकालानंतर शांतता राखण्यास सांगतिले आहे.

ट्विटरसारख्या माध्यमातून थेट पुणेकरांशी संवाद साधणाऱ्या पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडे अकाराच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. “अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही आला तरी तो कोणाचा पराभव किंवा विजय नसेल. सर्व पुणेकरांना आम्ही आवाहन करतो की या निर्णयामुळे आपल्या देशाच्या शांतता, एकता आणि सौदार्य जपणाऱ्या संस्कृतीला बळकटी मिळावी हेच आपले ध्येय असायला हवे,” असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पुणे पोलिस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डललाही टॅग करण्यात आले आहे.

दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदींनीही या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.