आदेशाचा भंग प्रकरणी गुन्हेही दाखल

पुणे : पोलिसांकडून संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेषत: नागरिकांनी सकाळी बाहेर फिरायला जाऊ नये तसेच अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केलेले असताना पोलिसांचा आदेश धुडकावून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना जरब बसविण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली.

हडपसर, बिबवेवाडी, स्वारगेट आदी भागात सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. एवढेच नव्हे तर भादंवि १८८ नुसार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांनी ४८ जणांवर गुन्हे दाखल केले. बिबवेवाडी, स्वारगेट पोलिसांकडून नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वारगेट पोलिसांनी २०० जणांना ताब्यात घेत. तसेच १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या. काहींना भररस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.

सुरुवातीला पोलिसांनी सकाळी बाहेर फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले होते. त्यांना समज देऊन घरी पाठविले होते. नागरिकांनी शक्यतो एकमेकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र, पोलिसांकडून करण्यात आलेले आवाहन तसेच प्रबोधनाचा काही फरक न पडल्याने अखेर पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी नागरिकांची कानउघाडणी तर केलीच, तर काहींना उठाबशा काढण्याचीही शिक्षा दिली.

करोनाचे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शक्यतो एक मेकांशी संपर्क टाळावा, यासाठी पोलिसांनी वेळोवेळी प्रबोधनही केले,तरीदेखील नागरिक मोठय़ा संख्येने सकाळी बाहेर फिरायला जातात. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाई तीव्र केली. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नागरिकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्यानंतर भविष्यात पारपत्र, पोलिसांकडून दिले जाणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवण्यात अडचण येऊ शकते.

– रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे</strong>