मुंबईनंतर राज्यात पुणे शहर करोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चाचण्या वाढवण्यात आल्यानं दररोज करोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचं दिसून येत आहे. शहरात आज दिवसभरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,७८१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९० हजार ८७१ वर पोहोचली आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,७८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांचा आकडा ९० हजार ८७१ वर पोहोचला आहे. दुसरीकडे आज दिवसभरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत २ हजार १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १,५७८ रुग्णांना दिवसभरात घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा ७३ हजार ५२७ रुग्ण इतका झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ४८ रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात १ हजार ४८ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४६ जण आज करोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ५१६ वर पोहोचली आहे. यात ३२ हजार १०९ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात ५ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.