ग्रामीण पोलिसांकडून २२ लाखांचा गुटखा जप्त

पुणे : टाळेबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येणाऱ्या परवान्याचा गैरवापर करून गुटखा वाहतूक केल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी या कारवाईत २२ लाख २७ हजारांचा गुटखा तसेच टेम्पो असा ३२ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी मानसिंग खुदहरणसिंह कुशवाह (वय ५०, रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), शीलदेव कृष्ण रेड्डी (रा. सिकंदराबाद, तेलंगणा) यांना अटक करण्यात आली आहे. टाळेबंदीत मद्य विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परराज्यातून काही जण छुप्या मार्गाने गुटखा पुणे शहर आणि ग्रामीण भागात विक्रीस पाठवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेलंगणाहून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पाटस टोलनाक्याजवळून जात असल्याची माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाटस टोलनाक्याजवळ सापळा लावून टेम्पो अडवला.

टेम्पोची पाहणी केली असता बिस्किटाच्या खोक्यांमागे गुटख्याची पोती लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. तेलंगणाहून निघालेला टेम्पो ५४० किलोमीटर अंतर कापून पुणे जिल्ह्य़ातून मुंबईकडे जात होता. बारामती गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सोमनाथ वाघमोडे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, रमेश मोरे, रामदास घाडगे, संपत खबाले, रमेश कदम यांनी ही कारवाई केली.