डिसेंबरपासून दुरुस्ती करण्याचे नियोजन

पाण्याची गळती होत असलेल्या टेमघर धरणाची दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने हे धरण निम्मे रिकामे करण्यात आले असून, त्यातील पाणी इतर धरणात सोडण्यात येत आहे. डिसेंबरपासून धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी ९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीसाठी या पूर्वी काढण्यात आलेल्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या आहेत.

पुण्याला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीत जुलै, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणाची क्षमता ३.७१ टीएमसी (अब्ज घनफूट) इतकी आहे. धरण पूर्ण भरले असताना त्यातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. दुरुस्तीचे काम तातडीने करण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दुरुस्तीच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या असून, ऑनलाइन पद्धतीने २५ नोव्हेंबपर्यंत या निविदा भरता येणार आहेत.

टेमघर धरणाचे शाखा अभियंता सुधीर अत्रे यांनी याबाबत सांगितले की, धरणाच्या दुरुस्तीसाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार डिसेंबरपासून काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. शासनाने या कामासाठी ९८ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात धरणाच्या मुख्य भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. सुमारे २४ महिन्यांच्या कालावधीत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे बंधन आहे.