सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी गरजू विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठात दोन नवी वसतिगृहे बांधली जाणार असून, त्यात मुलींसाठी दोनशे आणि मुलांसाठी चारशे अशा एकूण सहाशे जागा उपलब्ध होणार आहेत.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार या वेळी उपस्थित होते. यंदा विद्यापीठाने वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया बदलली. त्यात वसतिगृहाच्या क्षमतेइतक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्त विद्यार्थ्यांना सामावण्यासाठीची ‘गेस्ट’ पद्धत बंद करण्यात आली. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता प्राध्यापकांकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार वसतिगृह न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्याचे आढळून आले. त्यामुळे वसतिगृहांची क्षमता वाढवण्याची मागणी करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने दोन नवीन वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वसतिगृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन नवीन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्या द्वारे जास्त विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल. येत्या वर्षभरात काम पूर्ण करून पुढील शैक्षणिक वर्षांसाठी दोन्ही वसतिगृहे वापरासाठी उपलब्ध होतील,’ असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.