01 March 2021

News Flash

पुणेकरांना वाघ प्रिय!

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राणी दत्तक देण्याची योजना महापलिकेने सुरु केली

(संग्रहित छायाचित्र)

वाघाबरोबरच बिबटय़ा, हत्ती, माकडांना दत्तक घेण्यास पसंती

पुणे : महापालिकेच्या प्राणी दत्तक योजनेत पुणेकरांची सर्वाधिक पसंती वाघाला आहे. वाघानंतर बिबटय़ा, हत्ती, माकड या प्राण्यांना दत्तक घेण्याकडेही पुणेकरांचा ओढा असून वाघ पुणेकरांना अधिक प्रिय असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे घुबडही पुणेकरांच्या पसंतीला पात्र ठरले आहे. हरीण, सांबर, नीलगाय, चिंकारा, काळवीट, चितळ हे प्राणी दत्तक घेण्यास मात्र कोणी उत्सुक नसल्याचेही चित्र पुढे आले आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राणी दत्तक देण्याची योजना महापलिकेने सुरु केली आहे. गेली सात-आठ वर्षे ही योजना सुरू आहे. अगदी एका दिवसापासून वर्षभरापर्यंत प्राणी दत्तक घेता येतात. या योजनेअंतर्गत गेल्या आठ वर्षांत ३०६ प्राण्यांना दत्तक घेण्यात आले. त्यापोटी दत्तक संगोपन शुल्क म्हणून ३६ लाख २७ हजार ४३५ रुपये महापालिकेकडे जमा झाले आहेत. साप, मगर, माकड, हत्ती, वाघ, बिबटय़ा, मोर, कासव या प्राण्यांना दत्तक घेण्याकडे पुणेकरांचा ओढा आहे.

वाघाला आतापर्यंत ७५ वेळा दत्तक घेण्यात आले आहे. त्या खालोखाल बिबटय़ाला ५९ वेळा दत्तक घेण्यात आले आहे. हत्तीला ५६ जणांनी दत्तक घेतले, अशी माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली. हरीण, सांबर, नीलगाय, चिंकारा, काळवीट, चितळ या प्राण्यांना मात्र दत्तक घेण्यास पुणेकर फारसे उत्सुक नाहीत. त्या उलट मोर, माकड यांचे पालक होण्यास उत्सुकता दर्शविण्यात येत आहे. मोराला ३५ हून अधिक वेळा दत्तक घेण्यात आले असून घुबडाला पंधरा वेळा दत्तक घेण्यात आले आहे.

योजनेचा प्रचार हवा

सन २०११ पासून या योजनेअंतर्गत विविध प्राणी मी दत्तक घेतले आहेत. वाघापासून ते चिंकारापर्यंतच्या प्राण्यांचा यात समावेश आहे. प्राणी दत्तक योजनेचा प्रसार आणि प्रचार अधिक प्रमाणात होणे अपेक्षित आहे, असे प्राणी दत्तक घेतलेल्या मंजूषा दुर्वे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

काय आहे योजना?

विविध संस्था, व्यावसायिक कंपन्या, कर्मचारी, शाळांचे समूह, कुटुंब यांना हे प्राणी दत्तक घेता येतात. मात्र सामान्य नागरिकांकडून प्राणी दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने हे प्राणी दत्तक घेता येऊ शकतात. जितके दिवस प्राणी दत्तक घ्यायचा असेल, तेवढय़ा दिवसांचा त्याच्या अन्नाचा खर्च प्राणी संग्रहालयाला द्यावा लागतो. प्रारंभी या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एक दिवस किंवा एक महिन्यापर्यंत दत्तक घेण्याची तरतूद करण्यात आली. सध्या कमाल पाच वर्षांपर्यंतही प्राणी दत्तक घेता येतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या किंवा मोठय़ा उद्योग समूहांकडून मात्र या योजनेकडे पाठ फिरविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 3:15 am

Web Title: punekar likes tiger most in municipal animal adoption scheme
Next Stories
1 ‘ससून’च्या निधीवर डल्ला
2 कर्वे रस्त्यावरील लूटप्रकरणात चोराऐवजी तक्रारादाराचा शोध!
3 नाटक बिटक : वाचनातून उलगडणार मराठी रंगभूमीचा पट!
Just Now!
X