18 September 2020

News Flash

स्वप्नातही नसलेल्या पारितोषिकाचा आनंद

स्वप्नातही नसलेल्या पारितोषिकाचा आनंद

नाटक बिटक : चिन्मय पाटणकर

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश सुतार या विद्यार्थ्यांने स्पर्धेतील अभिनय नैपुण्यासाठीचं मानाचं केशवराव दाते पारितोषिक पटकावले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता भरत नाटय़ मंदिर इथं होणार आहे. या निमित्ताने आकाश सुतारशी साधलेला संवाद..

केशवराव दाते हे पारितोषिक तुला मिळाले, काय भावना आहे?

– माझा नाटकाशी संबंध येऊन जेमतेम एकच वर्ष झालं आहे. त्यामुळे आपल्याला कधी हे पारितोषिक मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, हे पारितोषिक जाहीर झाल्यावर झालेला आनंद शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. गंमत म्हणजे माझी भूमिका तशा अर्थानं प्रमुखही नव्हती. स्वप्नाच्या पलीकडचा आनंद असं म्हणता येईल..

 तुमची एकांकिका आणि तुझी भूमिका काय होती?

– आम्ही ‘टँजंट’ ही एकांकिका सादर केली होती. गेल्या वर्षीच्या स्पर्धामध्ये आम्हाला कुठेही यश मिळालं नाही. त्यामुळे या वर्षी चांगली कामगिरी करायचीच असं आम्ही ठरवलं होतं. नव्या कलाकार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही एकांकिका उभी केली. एका कुटुंबाची गोष्ट या एकांकिकेतून मांडली आहे. नात्यात स्वार्थ आल्यानंतर काय होतं, हा एकांकिकेचा विषय आहे. त्यात मी ‘आबा’ ही ज्येष्ठ नागरिकाची व्यक्तिरेखा साकारली. आजच्या पिढीचा विचार, नुकसान होतं म्हणून शेती न करणं, पैशाची हाव, नातेसंबंध असे मुद्दे यात हाताळण्यात आले आहेत.

तुमच्या महाविद्यालयाला जवळपास दहा वर्षांनी पारितोषिक मिळालं आहे. त्या विषयी काय सांगशील?

– महाविद्यालयात, कला मंडळात खूप आनंदाचं वातावरण आहे. आमच्या या यशानं नव्या कलाकार विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे महाविद्यालयात नाटक करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल. येत्या काळात विद्यार्थ्यांकडून चांगली नाटकं सादर केली जातील असा विश्वास वाटतो.

केशवराव दाते पारितोषिक मिळालेले अनेक विद्यार्थी आज मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात काम करण्याबाबत तुझा काय विचार आहे?

– मी मूळचा सांगलीचा.. मला नाटक किंवा कला क्षेत्राची काहीच पाश्र्वभूमी नाही. मला नाटक या माध्यमाविषयी खूप आकर्षण आहे. त्यामुळे पुढे जाऊन याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. संधी मिळाल्यास चित्रपटात काम करायलाही आवडेल. पण व्यक्तिश नाटकालाच माझं प्राधान्य असेल, कारण हा अतिशय जिवंत कला प्रकार आहे. इथं प्रेक्षक आणि कलावंत असा थेट संवाद होतो. त्यामुळे मला नेहमीच नाटक करायला आवडेल. खरंतर पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. पण सद्यस्थितीत कुटुंबाच्या आर्थिक गरजा महत्त्वाच्या असल्यानं नोकरी करत अभिनयाची आवड जपावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर पूर्णवेळ काम करू शकेन. कुटुंबाकडूनही माझी आवड जपण्यासाठी पाठिंबा आहे.

chinmay.reporter@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:43 am

Web Title: purushottam karandak ekanki competition interview akp 94
Next Stories
1 राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात घरफोडी
2 थकबाकी भरल्याशिवाय महापालिकेबरोबर नवा पाणीकरार नाही
3 विद्यापीठाकडे दहा वर्षांत केवळ १६ स्वामित्व हक्क
Just Now!
X