अवकाश मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी इस्रोकडून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बेंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयातून चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान २  उतरतानाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवार (२५ ऑगस्ट) पर्यंत मुदत आहे.

इस्रोने श्रीहरिकोटा येथून चांद्रयान २चे प्रक्षेपण केले होते. हे चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर ७ सप्टेंबरला उतरणे अपेक्षित आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अवकाश मोहिमांविषयी जागृती करण्यासाठी इस्रोने १० ऑगस्टपासून प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल. विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन विद्या प्राधिकरणाने परिपत्रकाद्वारे केले आहे.

या ऑनलाइन प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांना १० मिनिटांत २० प्रश्न सोडवावे लागतील. प्रश्न सोडवण्यासाठी पालक प्रश्नांचे भाषांतर करून पाल्यांना मदत करू शकतील. ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा  mygov.in  या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.