तपासनिसांना अत्याधुनिक ओळखपत्र देण्याचा निर्णय

पुणे : रेल्वेने प्रवास करीत असाल आणि तिकीट तपासनिसाच्या गणवेशात येऊन एखादी व्यक्ती कोणतेही कारण काढून पैसे उकळू पाहत असेल, तर आता त्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासा. कारण, काही दिवसांपासून पुणे रेल्वेत बोगस तिकीट तपासनिसांकडून नागरिकांची लूट केली जात आहे.  खबरदारी म्हणून रेल्वेने तिकीट तपासनिसांना अत्याधुनिक ‘क्यूआर कोड’चा समावेश असलेले ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाची व्यस्तता दिवसेंदिवस वाढत आहे. एकटय़ा पुणे स्थानकाचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षांमध्ये या स्थानकातून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाडय़ांची संख्या दुप्पट झाली आहे. सद्य:स्थितीत अडीचशेहून अधिक गाडय़ा स्थानकात ये-जा करतात. प्रवासी संख्येतही दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गाडय़ा आणि प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता सध्या पुणे स्थानकाची क्षमता जवळपास संपली आहे. त्यामुळे हडपसर येथे पर्यायी टर्मिनलची व्यवस्था उभारण्यात येत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पुणे स्थानक आणि तेथून सुटणाऱ्या उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्याही वाढत आहे. या प्रवाशांना पकडण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या वतीने नियमित तपासणी आणि काही वेळेला विशेष मोहिमेचे आयोजन सातत्याने करण्यात येते. त्यात फुकटे प्रवासी सापडण्यासह प्रवाशांना लुटणारे बोगस तिकीट तपासनीसही गेल्या काही दिवसांत सापडले आहेत.

पुणे रेल्वेच्या कार्यक्षेत्रामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विविध ठिकाणी पाच बोगस तिकीट निरीक्षकांना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे बनावट ओळखपत्रही सापडले असल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले. स्थानकांच्या आवारात किंवा रेल्वे गाडय़ांमध्ये तिकीट तपासनिसांच्या गणवेशात या व्यक्ती फिरत असताना पकडण्यात आल्या आहेत. या बोगस मंडळींकडून विविध प्रकारे प्रवाशांची लूट करण्यात आली आहे. बवानट ओळखपत्र दाखवून आणि प्रवाशांना दमबाजी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार करण्यात आले आहेत. ही बाब रेल्वेकडून अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच खबरदारी म्हणून रेल्वेच्या तिकीट तपासनिसांना क्यूआर कोड असलेली ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यातून तिकीट तपासनिसांची पडताळणी तातडीने केली जाऊ शकणार आहे.

तिकीट तपासनिसांचे ओळखपत्र तपासा!

पुणे रेल्वेमध्ये बोगस तिकीट तपासनीस आढळून आल्यानंतर रेल्वेने खबदारी म्हणून तिकीट तपासनिसांना क्यूआर कोड असलेली ओळखपत्र दिली आहेत. पुणे रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोणताही प्रवासी आपल्या मोबाइलमधील क्यूआर कोड स्कॅनरच्या मदतीने तिकीट तपासनिसांकडे असलेल्या ओळखपत्राची सत्यता पडताळून पाहू शकतो. रेल्वेने दिलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून वैध तपासनिसाची ओळख पटू शकते. याबाबत प्रवाशांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.