कोकण आणि विदर्भात मुसळधारांचा अंदाज

पुणे : पावसाचा जोर कमी असला तरी जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी (२६ जुलै) कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली.

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाला अनुकूल स्थिती होती. परिणामी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवस पावसाने दडी मारलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातही पावसाची हजेरी होती.

सध्याही मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे पूर्वमध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रिय स्थिती आहे. त्यामुळे कोकण, विदर्भासह राज्याच्या इतर भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार २८ आणि २९ जुलैला प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकेल. ३० जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते ३० जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.