News Flash

राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज

थंडीच्या वाटेत विघ्नांची मालिका

संग्रहीत

कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या वाटेत विघ्नांची मालिकाच उभी ठाकल्याने ती पूर्णपणे गायब होऊन राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे. मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार असून, यादरम्यान राज्यात सर्वच विभागांत पावसाची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ामध्ये उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीची लाट होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांत अनेक वर्षांतील नीचांकी तापामानाची नोंद झाली होती. या काळात महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र, पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढू शकला नाही. थंडीच्या मार्गातील हे विघ्न कायम असतानाच हिमालयातील पश्चिमी चक्रवात आणि राजस्थानपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडील राज्यातील थंडीची लाट निवळली आणि तेथे पावसाळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणातही झपाटय़ाने बदल झाले. तापमानात वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली.

राज्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले. सोमवारी मुंबई परिसरासह कोकणात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना, विदर्भात अकोला आणि नागपूर भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानाचा पारा १७ ते २० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सरासरीपेक्षा हे तापमान तब्बल ६ ते ८ अंशांनी अधिक असल्याने आणि रात्री ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. कोकण विभागातही मुंबईसह सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीपुढे जाऊन २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान ३ ते ६ अंशांनी सरासरीपुढे गेले आहे.

हवामान..

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ५ आणि ६ जानेवारीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ७ जानेवारीला कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या दिवशीही या विभागांत विजांच्या कडकडाटाचा इशारा आहे. ८ जानेवारीलाही राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:38 am

Web Title: rain in maharashtra mppg 94
Next Stories
1 स्पर्धा परीक्षा, प्रक्रिया रखडण्यास राज्य शासनच कारणीभूत
2 पहिल्या दिवशी बहुतांश खासगी शाळा बंदच
3 उत्तम सुविधा, कमी खर्च, मोजकीच उपस्थिती
Just Now!
X