‘मांडी घालून बसल्याखेरीज चित्र रेखाटता येत नाही’
कितीही मतमतांतरे असली, तरी राजकीय वर्तुळात अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव कायमच आदराने घेतले जाते. वाजपेयी यांच्या निधनानंतर ‘मावळता सूर्य’ हे अटलजी यांच्या भुवयांपर्यंतचे अर्कचित्र व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी चितारले होते. ‘ते अर्धवट चित्र आता पूर्ण करतो’ असे सांगत अर्कचित्र रेखाटून राज यांनी अटलजींना गुरुवारी आदरांजली अर्पण केली. ‘मांडी घालून बसल्याखेरीज चित्र रेखाटता येत नाही,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी उभे राहूनच कॅनव्हासवर पेन्सिलने रेखाचित्र आणि नंतर स्केचपेनने काही क्षणांतच अटलजी साकारले.
विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदनतर्फे ‘पुणे आर्ट पुणे हार्ट’ या कला उत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. जे. जे. कला महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे, विवेक खटावकर, महेश साळगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल शिदोरे, बाबू वागसकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सीमा विधाते, स्वप्नील नाईक, चेतन धोत्रे, विजय महामुलकर उपस्थित होते.
साठीला लोक निवृत्त होतात, एम. एफ. हुसेन या नावाजलेल्या चित्रकाराची कारकीर्द साठीनंतर सुरू झाली होती. इटली येथील प्रदर्शनात पिकासो यांच्या चित्रासमवेत हुसेन यांचे चित्र पाहिल्यानंतर रसिकांचे हुसेन यांच्याकडे लक्ष गेले. तो त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण ठरला, असे ठाकरे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 3:34 am