20 September 2020

News Flash

रॅम्बो सर्कशीतील प्राणी ताब्यात

रॅम्बो सर्कशीचे खेळ सध्या सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर होत आहेत.

सांगवीतील मैदानात सुरू असलेल्या रॅम्बो सर्कशीतील हत्ती, घोडे आदी प्राण्यांना मोठय़ा वाहनांमध्ये टाकून नेण्यात आले. 

सांगवीत तक्रारीनंतर कारवाई, परस्परविरोधी दावे

सांगवीतील मैदानात सुरू असलेल्या रॅम्बो सर्कशीमध्ये प्राण्यांचा वापर बेकायदेशीरपणे केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राणी कल्याण मंडळाने पोलीस व वनविभागाच्या सहकार्याने सर्कशीतील चार हत्ती, चार घोडे आणि १४ कुत्रे ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मोठा गदारोळ झाला. या संदर्भात, दोन्ही बाजूने परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्कशीत हत्ती, घोडे नसल्यास ती पाहण्यासाठी येणार कोण, असा मुद्दा उपस्थित करत अशाप्रकारे सर्कशीला ग्रहण लागल्यास सर्कशीत काम करणाऱ्या हजारो कलावंतांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती सर्कस चालकांकडून व्यक्त करण्यात आली.

रॅम्बो सर्कशीचे खेळ सध्या सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर होत आहेत. प्राणी कल्याण मंडळाचे सुनील हवालदार व त्यांच्या पथकाने पोलीस व वनविभागाच्या सहकार्याने सर्कशीतील प्राणी ताब्यात घेण्याची कार्यवाही केली, त्यावरून बराच गोंधळ झाला होता. तसेच जप्त केलेल्या प्राण्यांना वाहनांमध्ये चढवताना बरीच कसरत करावी लागली होती. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यांना आवरणे कठीण झाले होते. या संदर्भात, हवालदार यांनी सांगितले, की संबंधितांकडे नोंदणी नाही, परवाने नाहीत, त्यामुळे त्यांचे खेळ बेकायदेशीरपणे सुरू होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस आयुक्तांना माहिती दिली व पुढील कारवाई करण्यात आली आहे. रॅम्बो सर्कशीचे वकील प्रदीप आगरवाल यांनी आरोप फेटाळून लावले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी अशाप्रकारे कारवाईचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. हत्तींना साखळदंड बांधून गुंगीचे औषध देऊन आणि धाक दाखवून नेण्यात आले. प्राण्यांच्या विषयावरून न्यायालयात दावा सुरू आहे, ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मात्र, कोणाचेही काहीही त्यांनी ऐकून घेतले नाही. त्यांना अशाप्रकारे कारवाई करण्याचे अधिकार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हत्ती, घोडय़ासारखे प्राणी सर्कशीत नसतील तर सर्कस पाहण्यासाठी येणार कोण, सर्कशीचे खेळ बंद पडल्यास कलाकारांच्या रोजगाराचा विषय निर्माण होण्याची भीती चालकांनी व्यक्त केली.

सर्कशीत जोकरचे काम करणाऱ्या विजू नायर याने सांगितले, की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. कारवाईच्या वेळी अरेरावीची भाषा वापरली. हाता-पाया पडलो, मात्र, त्यांनी ऐकले नाही. या प्राण्यांना आम्ही जीव लावतो, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवतो. त्यांनी घेऊन गेल्यानंतर आम्ही कोणी जेवलो नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 3:12 am

Web Title: rambo circus in pune
Next Stories
1 शनिवारची मुलाखत : अचूक रोगनिदान चाचण्यांसाठी..
2 दरडी कोसळून दुर्घटना टाळण्यासाठी नव्या कात्रज बोगद्यात उपाययोजना
3 पालखी सोहळ्यासाठी सज्ज राहण्याचे आयुक्तांचे आदेश
Just Now!
X