चिंचवड नाटय़गृहाचे नूतनीकरण संशयास्पद

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, असे महापालिकेचे धोरण दिसून येत नाही. नाटय़गृहांची दुरुस्ती काढणे, नाटय़गृहांच्या भाडेदरात वाढ करणे, तेथील सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणे, अनावश्यक खर्च करणे आणि प्रेक्षकांच्या हिताचा विचार करण्याऐवजी फक्त खाबुगिरीचे उद्योग करणे, यामुळे उद्योगनगरीत सांस्कृतिक अधोगती दिसून येते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी पाच महिने नाटय़गृह बंद ठेवले. नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले. मुळात इतका खर्च झाला आहे का, इथपासून सुरुवात आहे. दुसरीकडे, नूतनीकरणाचा फारसा उपयोग झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याआधीच नाटय़गृह सुरू करण्यात आले. सगळीकडे राडारोडा पडलेला असताना त्यातच दिवाळी पहाटचे कार्यक्रम पार पडले. काही दिवस नाटय़गृह बंद ठेवण्यात आले. त्यानंतर, १५ नोव्हेंबरपासून राज्य नाटय़ स्पर्धासाठी नाटय़गृह सुरू करण्यात आले. मात्र बाहेरून चकचकीत वाटणाऱ्या नाटय़गृहातील अंतर्गत भागात मूळ समस्यांची जंत्री कायम आहे. कलावंतांना तसेच प्रेक्षकांना नूतनीकरणातील फोलपणा दिसून आला आहे. नाटय़गृहात स्वच्छतेचा अभाव आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य आणि राडारोडा आहे. वातानुकूलित यंत्रणा सुरू झाल्यानंतर होणाऱ्या आवाजाचा कलावंत आणि प्रेक्षकांना त्रास होतो. ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष आहे. व्यासपीठावरचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. तो वाढवला तर एकदम शिट्टीसारखा आवाज होतो. विंगेचा आकार कमी केल्याने आणखी अडचणीचे झाले आहे. मेकअप खोलीत अपेक्षित सुधारणा झालेल्या नाहीत. खिडक्यांना पडदे नाहीत. नव्या खुर्च्या आरामदायी वाटत नाहीत. शौचालयाची जागा अतिशय अपुरी पडते आहे. वाहनसंख्येनुसार वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नाही. प्रेक्षागृहात आत-बाहेर करताना दरवाजांचे विचित्र आवाज होतात. त्यामुळे सर्वाचाच रसभंग होतो.

हे नाटय़गृह म्हणजे समस्यांचे माहेरघर झाले आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. अननुभवी अधिकाऱ्यास व्यवस्थापकपदावर बसवण्यात आले. नाटय़गृहाच्या दृष्टीने अपेक्षित कामकाजाचे नियोजन होत नाही. तारखा वाटपाचे घोळ सुरू आहेत. वशिलेबाजीशिवाय तारखा मिळत नाहीत. नाटक कंपन्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे चांगली नाटके चिंचवडला येत नाहीत. महापालिकेचे धोरण शहरातील सांस्कृतिक चळवळीला पूरक असायला हवे. मात्र ते मारक ठरत आहे. कलावंत आणि प्रेक्षकांच्या सूचनांचा विचार होत नाही. अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार संगनमताने खाबुगिरी करतात. चार आण्याचे काम बारा आण्याला नेतात, असेच आजपर्यंत दिसून आले आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कल काम करण्याऐवजी मिरवण्याकडे अधिक दिसून येतो. सध्या ज्यांच्याकडे सांस्कृतिक विभागाची धुरा आहे, त्या अधिकाऱ्याच्या कामाचा ‘गवगवा’ सर्वश्रुत आहे. बेजबाबदार अधिकारी आणि चुकीच्या धोरणांमुळेच शहरात सांस्कृतिक अधोगती होत आहे. मात्र, कोणी त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण, कोणालाच काही सोयरसुतक नाही.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

चिंचवडला भरदिवसा १२ वर्षीय माही जैन या शाळकरी मुलीचे अपहरण झाले व तिच्या सुटकेसाठी ५० लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणाची समाजमाध्यमावर वेगाने माहिती पसरल्याने शहरभर खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्याने अल्पावधीत तिची सुखरूप सुटका होऊ शकली. या प्रकरणी नितीन सत्यवान गजरमल आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा या आरोपींना अवघ्या नऊ तासांत गजाआड करण्याची शहर पोलिसांची कामगिरी निश्चितपणे कौतुकास पात्र आहे. १५ नोव्हेंबरला माही शाळेतून घरी आली. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे तिने शाळेची पिशवी दिली व ती पेन आणण्यासाठी दुकानात गेली. तेव्हा बाहेरच दबा धरून बसलेल्या आरोपींनी चारचाकी मोटारीतून तिचे अपहरण केले. हे प्रकरण पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घेतले. आरोपींनी माहीच्या वडिलांकडे ५० लाखांची खंडणी मागण्यासाठी दूरध्वनी केला आणि पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. खबऱ्यांच्या माहितीचा आधार घेऊन तांत्रिक तपास करत गुन्हे शाखा व खंडणीविरोधी पथकातील पोलिसांनी आरोपींचे ठिकाण शोधून काढले. हिंजवडीलगत नेरे गावात असलेल्या आरोपींची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना पैशांची गरज होती. त्यासाठीच उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या क्विन्स टाउन ते पाळत ठेवून होते. अशातच, माही एकटीच दिसून आल्याने आरोपींनी तिचे अपहरण केले. पोलिसांनी माहीची सुखरूप सुटका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

राष्ट्रवादीचा पुण्यावर, काँग्रेसचा मावळवर डोळा

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक झाली, त्यात राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादीकडे असणाऱ्या मावळ लोकसभेची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि पिंपरीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. मावळात राष्ट्रवादीचा सातत्याने पराभव होत आला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर होता. मावळ लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. मावळातील पराभवाची परंपरा खंडित करायची असल्यास राष्ट्रवादीऐवजी यंदा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. राष्ट्रवादीचा पुणे लोकसभेच्या जागेवर डोळा असल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही अडचणीची खेळी केल्याचे बोलले जात आहे.