महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अपेक्षेप्रमाणे कसब्यातून रवींद्र धंगेकर, कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून नाना भानगिरे, कॅन्टोन्मेंटमधून अजय तायडे यांना उमेदवारी देण्यात आली असून पर्वतीमधून जयराज लांडगे यांना उमेदवारी मिळाली आहे. खडकवासल्यातून राजाभाऊ लायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडगावशेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत. जाहीर झालेल्या सहा उमेदवारांपैकी पाच नगरसेवक आहेत.
मनसेच्या १५३ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर झाली. त्यात पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांना हडपसर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून त्यांची लढत शिवसेनेचे महादेव बाबर यांच्याबरोबर होईल. भानगिरे मनसेकडून लढणार असले, तरी ते तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेचेच नगरसेवक आहेत. कसब्यातून गेल्या वेळी लढलेले नगरसेवक रवींद्र धंगेकर हेच पुन्हा मैदानात उतरणार असून कोथरूडमधून नगरसेवक किशोर शिंदे निवडणूक लढवतील. नगरसेवक अजय तायडे यांना अपेक्षेप्रमाणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश बागवे यांच्याशी त्यांची लढत होईल. पर्वतीमधून जयराज लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खडकवासला मतदारसंघातून नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. त्यबरोबरच शिवाजीनगरमधूनही अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. तेथून नगरसेवक राजू पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.