राज्यच नव्हे, तर देशात कोणत्याही शहराच्या तुलनेत नव्या दुचाकी वाहनांची नोंदणी सर्वाधिक संख्येने होणाऱ्या पुणे शहरामध्ये सध्या हा वेग कमालीचा मंदावला आहे. करोनाच्या कालावधीतील टाळेबंदी आणि त्यानंतर देण्यात आलेली शिथिलता या संपूर्ण काळात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नीचांकी संख्येने वाहनांची नोंद होत आहे. सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीनंतर पुणे आरटीओने दुचाकींच्या नोंदणी क्रमांकाची नवी मालिका जाहीर केली आहे. १० हजार नव्या दुचाकींची ही मालिका टाळेबंदीपूर्वी केवळ १५ दिवसांतच संपत होती. आता हा कालावधी दीड महिन्यांवर गेला आहे.

लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक आणि त्यात झपाटय़ाने होणारी वाढ पुणे शहराबाबत सातत्याने चिंतेचा विषय राहिला आहे. इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील रस्त्यांवर नव्या दुचाकी वाहनांची भर टाळेबंदीपूर्वी सर्वाधिक वेगाने होती. दुचाकी नोंदणीच्या एका मालिकेमध्ये दहा हजार क्रमांक असतात.

टाळेबंदीपूर्वी नोंदणीची एक मालिका पूर्ण होण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे साधारणत: दर पंधरा दिवसांनी दुचाकी नोंदणीची नवी मालिका आरटीओकडून जाहीर करण्यात येत होती. म्हणजेच प्रत्येक पंधरा दिवसांनी शहरात १० हजार नव्या दुचाकींची भर पडत होती.

पहिली कठोर टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आरटीओचे कामकाज बंद करण्यात आले होते. मात्र, पहिल्या शिथिलतेनंतर ते काही प्रमाणात सुरू करण्यात आले. नव्या वाहनांची नोंदणीही सुरू करण्यात आली असली, तरी त्यात घट झाली. पुणे शहरात जुलैमध्ये पुन्हा दहा दिवस कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर त्यात पुन्हा शिथिलता देण्यात आली.

या कालावधीत नव्या वाहनांच्या नोंदणीत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. नव्या दुचाकींच्या नोंदणीसाठी २४ जूनला नवी मालिका जाहीर करण्यात आली होती. ती आता सुमारे दीड महिन्यांनंतर संपत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकींसह इतर वाहनांच्या नोंदणीतही सध्या घट झाली आहे.

पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी आवाहन

पुणे आरटीओकडून दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाची नवी मालिका जाहीर करण्यात आली आहे. त्यातील आकर्षक किंवा पसंतीचे क्रमांक तीनपट किंवा नियमित शुल्क भरून राखून ठेवण्यात येतात. हे क्रमांक हवे असणाऱ्या नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीचे आकर्षक क्रमांक चारचाकी वाहनांसाठी हवे असल्यास संबंधितांनी १७ ऑगस्टला सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या कालावधीत आरटीओ कार्यालयात रकमेच्या डीडीसह इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करायचा आहे. दुचाकीसाठी आकर्षक क्रमांक हवा असल्यास १८ ऑगस्टला त्याच वेळेत ही प्रक्रिया होईल.