शहरातील वापरात नसलेले खांब हटवले; अडीच वर्षांच्या पाठपुराव्याला यश

रस्त्यावर आणि रस्त्याकडील वापरात नसणारे खांब हटविण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ३६ मधील तब्बल ५० खांब आतापर्यंत हटविण्यात आले आहेत. यासाठी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी गेली अडीच वर्षे पाठपुरावा केला होता.

शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांवर वापरात नसलेले खांब जागोजागी पडून आहेत. विशेषत: महावितरणतर्फे वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाल्यानंतर अशा खांबांची संख्या वाढली. वीजवाहिन्या भूमिगत केल्यानंतरही शेकडो खांब मात्र हटवण्यात आले नव्हते. तसेच जे खांब हलवायचे म्हणून काढण्यात आले होते त्यातील अनेक खांब रस्त्यांच्या कडेने किंवा गल्ली-बोळांमध्ये, पदपथांच्या बाजूने टाकण्यात आले होते.

रस्त्यावरचे असे बिनकामाचे आणि वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे आणि अडगळ ठरणारे खांब काढून टाकावेत, अशी मागणी नगरसेविका सहस्रबुद्धे यांनी लावून धरली होती. सर्वप्रथम त्यांनी ही मागणी जानेवारी २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्य सभेत केली. ही समस्या मांडल्यानंतर प्रथमच हा विषय चर्चेत आला. सर्वाचेच लक्ष त्यामुळे या समस्येकडे वेधले होते. तसे खांब हलवण्याबाबत आयुक्तांनी आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात मात्र खांब जागेवरच होते.

प्रभागात असे ‘डेड पोल्स’ किती आहेत याचे सर्वेक्षणही सहस्रबुद्धे यांनी केले होते. या सर्वेक्षणात त्यांना १५५ बिनकामाचे खांब दिसले होते. कर्वे रस्ता, प्रभात रस्ता, केतकर रस्ता, विधि महाविद्यालय रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर तसेच त्यांना समांतर असलेल्या गल्ल्यांमध्ये हे खांब होते. त्यातील पन्नासहून अधिक ‘डेड पोल्स’ काढून टाकण्यात सहस्रबुद्धे यांना यश आले आहे. रस्त्यावरील वाहतुकीत बेसुमार वाढ झाल्याने रस्त्यावरील इंच न इंच महत्त्वाचा बनला आहे. अशा वेळी बिनवापरातले खांब हे रस्त्यावरील अतिक्रमणच ठरते. तसेच, अशा खांबांभोवती रानटी वेल वाढतात, कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जातात. त्यामुळे परिसर विद्रूप व अस्वच्छ होतो.

माझा प्रभाग एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत स्वच्छ प्रभाग सर्वेक्षणात सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. अशा वेळी ही बिनकामाच्या खांबांची अडगळ काढून प्रभाग स्वच्छ करणे मला महत्त्वाचे वाटले, यासाठी मी खांब हटवण्यासाठी आग्रही होते, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

खांब हटवण्याचे काम महत्त्वाचे आहे आणि ते झाले पाहिजे असे सर्वानाच वाटत होते. मात्र या कामासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदच केली जात नव्हती. सहस्रबुद्धे यांनी पाठपुरावा केल्यामुळे यंदा प्रथमच या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आणि त्या तरतुदीतून खांब हटवण्याचे काम करण्यात आले.