केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते असून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांची चर्चा ते काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्याशी करतील. ‘साहेबांची’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोकसभेसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जागावाटपाचा २२-२६ चा फॉम्र्युला ठरला असल्याचे विधान शरद पवार यांनी केले, त्यास प्रत्युत्तर देताना माणिकरावांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. याविषयी अजितदादा म्हणाले, अहमद पटेल व प्रफुल्ल पटेल यांच्यात वरिष्ठ पातळीवर जागावाटपाची चर्चा झाली आहे. ‘साहेब’ सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील, माणिकरावांशी नव्हे. आपणही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करत असल्याचे सांगत माणिकरावांना फारसे महत्त्व देत नसल्याचे अजितदादांनी सूचित केले.
देशभर गाजलेल्या मावळ गोळीबारातील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्याविषयी विचारणा केली असता त्यांनी भाजपची दुतोंडी भूमिका उघड केली. सरकारची मदत घेऊ नका, आम्ही मदत करू, अशी घोषणा भाजपने तेव्हा केली होती. त्याचे काय झाले, असा मुद्दा अजितदादांनी उपस्थित केला. आम्ही मानवतेच्या भावनेतून मदत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपवाल्यांनी तुमच्या नोकऱ्या नको, पैसाही नको अशी भूमिका घेतली. आता दोन वर्षांनंतर नोकरीचे काय, असे ते कोणत्या तोंडाने विचारत आहेत. गोळीबार प्रकरणात आपल्याला व राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न झाला होता. आपण गोळीबाराचे समर्थन करणार नाही. त्या संदर्भात चौकशी समिती नियुक्त केली होती, त्याचा अहवाल आलेला आहे. दुष्काळानंतर अतिवृष्टीचे संकट ओढावले आहे. कधी नव्हे ते उजनी इतक्या लवकर भरले आहे. पिंपरी-चिंचवडच्या महापौर बदलाचा विषय राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. इतरांनी त्याची काळजी करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.