सज्जनगडावर सध्याच्या वाहनतळापासून महाद्वारानजीक वाहनाने जाता यावे यासाठी ८०० मीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. शिवाय समर्थ रामदास मठाच्या दुरुस्तीच्या वेळी तिथल्या शेजघराचा मूळ पाया सापडला असून हे शेजघर पूर्वी होते तसे पुन्हा बांधण्याचा ‘श्री रामदास स्वामी संस्थान’चा विचार आहे. संस्थानचे अध्यक्ष सु. ग. ऊर्फ बाळासाहेब स्वामी यांनी ही माहिती दिली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सज्जनगडाला सध्या २८० पायऱ्या असून ज्येष्ठ नागरिकांना त्या चढून जाणे अडचणीचे ठरते. नव्याने बांधल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे गडाच्या महाद्वारानजीक वाहनाने पोहोचता येईल. बाळासाहेब स्वामी म्हणाले, ‘सध्या ज्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था आहे तिथपासून गडावर जाण्यासाठी ८०० मीटरचे अंतर आहे. या ठिकाणी एका वेळी दोन वाहने जाऊ शकतील इतक्या रुंदीचा कच्चा रस्ता तयार झाला असून पक्क्य़ा रस्त्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तो रस्ता खुला करता येईल. हा रस्ता जिथपर्यंत आहे त्याच्या पुढे १०० मीटर अंतरावर गडाचे महाद्वार आहे. या १०० मीटर अंतरात वनखात्याची ५ एकर जागा असून ती संस्थानला विकास कामांसाठी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यासंबंधी २ महिन्यांपूर्वी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे प्रस्ताव दिला असून त्यांनी प्रस्तावास तत्त्वत: मान्यताही दिली. आता साताऱ्याच्या वन विभागाकडून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.’
दोन वर्षांपूर्वी समर्थ मठाच्या दुरुस्तीच्या वेळी तिथल्या शेजघराचा (जिथे समर्थ रामदासांनी देह ठेवला ती जागा) मूळ पाया सापडला आहे. हे शेजघर पूर्वीसारखे बांधण्यासाठी संस्थानचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सध्या शेजघराच्या तीन बाजूंना वाढीव बांधकाम केलेले असून तिथे नैवेद्य बनवण्याची सोय आहे. शेजघर पूर्वीसारखे पुन्हा बांधायचे आणि सध्या तिथे असलेले वाढीव बांधकाम स्वतंत्र इमारतीत हलवायचे असा विचार आहे. असे झाल्यास शेजघरात समर्थ रामदासांच्या वापरातील वस्तू, त्यांचे व कल्याण स्वामींचे हस्ताक्षर, त्या काळच्या सनदा इत्यादींचे संग्रहालय करता येईल.’     
सज्जनगडाला संरक्षक कठडे बांधण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पर्यटन खात्याकडून ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील २० लाख रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध झाला असून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कठडे व प्रदक्षिणा वाट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही बाळासाहेब स्वामी यांनी सांगितले.